माहेरवाशिणींचे मोठ्याथाटात आगमन

🔹महालक्ष्मींच्या स्वागतासाठी महिलावर्गाची लगबग

✒️मनोहर खिरटकर (खांबाडा प्रतिनिधि)

खांबाडा (दि.10 सप्टेंबर) :- लाडक्या गणरायाचे शनिवारी दि. ७ उत्साहात आगमन झाल्यानंतर गृहिणींना प्रतीक्षा असलेल्या गौरींचे मंगळवारी दि. १० ला थाटात आगमन होणार आहे. गौरी पूजनासाठी महिलांची धावपळ वाढली असून, चार दिवसांपासून गौरी पूजनाचे साहित्य खरेदीसाठी बाजारातही गर्दी वाढली होती.

गौरी पूजनाचा सण तीन दिवस असल्याने गौरींना दागिने अर्पण करण्यापासून वेगवेगळ्या प्रकारची व्यंजने, मिठाईचा नैवेद्य दाखविण्यासाठी महिलावर्गाची धावपळ सुरू आहे. मंगळवारी गौरींचे आगमन झाले असून, बुधवारी दि. ११ला पूजन करण्यात येणार आहे. तर गुरुवारी गौरींचे विसर्जन होणार आहे. गौरी पूजनाच्या निमित्ताने ज्ञातीबांधव एकमेकांच्या घरी भेटी देत असल्याने यानिमित्ताने स्नेहभाव वृद्धिंगत होण्यासही मदत होते. गौरींचा साजश्रृंगार, दागिने खरेदीसाठीही बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. यावेळी सराफी दुकानात मंगळसूत्र, ठुशी, कमरपट्टा, मुकुट, लक्ष्मीहार, कर्णफुले, बिंदी, हातातले कंगन आदी पारंपरिक दागिने खरेदीला मागणी होती. गौरींच्या पादुका, जेवणाचे व पूजेचे ताट, रत्नांचे व सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करतानाही महिलावर्ग दिसून आला.

गौरी आवाहनाचा शुभमुहूर्त :- सोमवारी दि. ९ संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून अनुराधा नक्षत्रास प्रारंभ झाला असून, मंगळवारी रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी समाप्ती होणार आहे. यंदा मंगळवारी दि. १० सूर्योदयापासून सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरींचे आवाहनाचा मुहूर्त आहे. गौराईच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी ९.३० ते १२ हा शुभकाळ आहे. तर दुपारी ३ ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहुकाळ असल्याने या काळात गौराईंचे आवाहन करू नये, असे आवाहन गुरुजींनी केले आहे.