✒️परमानंद तिराणिक वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.9 मार्च) :-नारी शक्तीचा सन्मान अधोरेखित करणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा पोलीस व वरोरा पोलीस विभागाच्या वतीने वरोरा पोलीस स्टेशन परिसरात महिला सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी(भापोसे ) हे होते.
व्यासपीठावर वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकिरण मडावी. पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आयुष नोपानी म्हणाले की, स्त्री या देशाचे भविष्य ठरविणारी शक्ती आहे. विकसित समाजासाठी स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे. स्त्रीया वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी जबाबदारीने काम करीत आहे तरीही घरातही तितक्याच कर्तव्यदक्ष आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांना सहभागी करून घेण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्यात.
त्यात पोलीस विभागामध्ये महिलांसाठी ३० टक्के राखीव जागा निर्धारित करण्यात आल्यात. काही राज्यात ही टक्केवारी जास्त ही आहे. पोलीस विभागामध्ये महिला व पुरुषांमध्ये भेद न करता सर्वांसाठी एकच प्रकारचा युनिफॉर्म कायम ठेवून स्त्री पुरुष समानतेवर भर दिलेला आहे. ते पुढे म्हणाले की, स्त्री मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर ती अधिक सक्षम बनेल.
पोलीस निरीक्षक अमोल काचोरे म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात महिलांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यावेळी त्यांनी महिला दिनाचे महत्व विशद केले.कार्यक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस राजकिरण मडावी,पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.
महिला दिनाचे औचित्य साधून वरोरा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिला अधिकारी व अंमलदार यांना सुपूर्द करण्यात आले. ठाणा प्रमुख म्हणून पोलीस उपनिरीक्षक वर्षा तांदुळकर यांनी काम पाहिले.
सुरुवातीला वरोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, ठाणेदार अमोल काचोरे याच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे वरोरा तालुका अध्यक्ष सादिक थैम यांनी देखील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे यांनी केले.
कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे, किशोर मित्तलवार, पत्रकार प्रवीण खिरटकर, सादिक थैम, चेतन लुतडे,सारथी ठाकुर,लखन केशवाणी आदींसह सामाजिक कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते