महिलांवरील अत्याचारांविरुद्ध आम आदमी पार्टी, चंद्रपूर महिला आघाडीचा तीव्र निषेध

✒️ सुनील चटकी चंद्रपूर (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.30 ऑगस्ट) :- कोलकाता, बदलापूर, नागभीड, दुर्गापूर (चंद्रपूर) येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध करत, आम आदमी पार्टीच्या चंद्रपूर महिला आघाडीतर्फे गांधी चौक, चंद्रपूर येथे आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला आघाडीच्या प्रमुखांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे उपस्थित केला.

आम आदमी पार्टीच्या चंद्रपूर शहर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख यांनी या प्रसंगी बोलताना महिलांवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात तीव्र शब्दात आपला निषेध व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारने तातडीने कठोर पावले उचलली पाहिजेत. महिलांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळणे हा प्रत्येक महिलेचा हक्क आहे, आणि सरकारने त्यासाठी कोणत्याही प्रकारचा तडजोड करू नये.”

शहर महिला सदस्य सुजाता देठे यांनी देखील आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारच्या घृणास्पद कृत्यांना सामोरे जाण्यासाठी सरकारने कठोर कायदे लागू करावेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन एक आदर्श निर्माण करावा, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचे कृत्य करण्यास धजावणार नाही.”

आंदोलनादरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात महिला आघाडीच्या सदस्यांसह अनेक स्थानिक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

आम आदमी पार्टी, चंद्रपूर महिला आघाडीने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला महिलांच्या सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. या वेळी शहर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, जिल्हा युवा अध्यक्ष राजू कुडे, जिल्हा महासचिव संतोष दोरखंडे, जिल्हा सचिव प्रशांत शिदूरकर, महानगर संघटणमंत्री संतोष बोपचे व सिकेंदर सागोरे, बल्लारशा शहर उपाध्यक्ष सय्यद अफझल आली, बल्लारशा प्रवक्ता असिफ शेख, अल्पसंख्याक आघाडी महानगर अध्यक्ष जावेद सय्यद, शानवाज खान, शोएभ आली, नाजमा शेख, सुजाता देठे, कविता शाश्त्रकार, करुणा ताई, प्रतीक्षा सागोरे, जितेंद्र भाटिया, महानगर मीडिया प्रमुख प्रशांत रामटेके व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.