🔸माधव भांडारी यांच्या “दृष्टीकोन” या लेखसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन
✒️पुणे(Pune विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
पुणे (दि.12 डिसेंबर) :- भाजपाच्या आजवरच्या यशात वैचारिक लढाईचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादऩ वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री माधव भांडारी यांच्या “दृष्टीकोन” या लेखसंग्रहाचे प्रकाशन करतांना ते बोलत होते. माधव भांडारी यांच्यासारखे विचारवंत समाजाची वैचारिक मशागत करत आहेत याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.
पुण्यातील डेक्कन येथील सावरकर अध्यासनात झालेल्या या प्रकाशन समारंभात पुण्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते श्री केशव उपाध्ये, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद एकबोटे, उत्कर्ष प्रकाशनचे श्री जोशीकाका हेदेखिल उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भाजपाच्या या वैचारिक लढाईत माधव भांडारी यांचे योगदान महत्वपूर्ण असून कार्यकर्त्यांसोबतच समाजाची वैचारिक मशागत करण्याचे काम त्यांच्या लेखनातून होत आहे. मनात कितीही द्वंद्व असले आणि समोर कितीही विरोध असला तरीही निश्चलपणे काम करत राहणारी ही व्यक्ती आहे.
श्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, आज समाजात विषारी विचार पसरविणाऱ्या शक्तींपासून समाजाला वाचविण्याकरता आपल्याला अधिक शक्तीने काम करण्याची आवश्यकता आहे, ती वैचारिक शक्ती पुरविण्याचे काम पुस्तके करतात, असेही ते म्हणाले. या पुस्तकांच्या रूपानेच पुढील पिढ्यांच्या हाती आपण वैचारिक सोने देवू शकतो.
ते पुढे म्हणाले की ही विचारांची व दृष्टीकोनाची लढाई अत्यंत महत्वाची आहे. काही गट स्वतः सोने पांघरून समाजाला विषारी विचारांच्या चिंध्या देत आहेत. मेंदू बधीर करून त्यात सोशल मिडियातून विषारी विचारांचे सॉफ्टवेअर भरण्याचे काम अर्बन नक्षलवाद्यांकडून सुरू आहे.
मात्र तरीही आज भारतीय संस्कृतीला जागतिक मानसन्मीन मिळत आहे. या देशाच्या संस्कृतीने विजेत्यांची नव्हे तर नेहमीच सत्याची बाजू घेणे आणि सत्याचा सन्मान करणे शिकवले आहे. या देशात विजेता नादिरशाह नव्हे तर देश व समाजासाठी त्याग करणारे त्यागमूर्ती राणा प्रताप आणि गौतम बुद्ध हेच आदर्श मानले गेले आहेत. हीच संस्कृती जग आज स्वीकारत आहे. अमेरिकेत २० लक्ष विद्यार्थी संस्कृत शिकत आहेत. जर्मनीत इंडॉलॉजी विषयाला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती मिळते आहे.
ज्या देशात केवळ एकच प्रेषित मानत होते, त्या देशातील अबुधाबीत आज जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर उभारले जात आहे. तेथील सरकारने डिपार्टमेंट ऑफ टॉलरन्स सुरू केले आहे. आज जग सोन्याच्या पेल्यातील विष नाकारून भारतीय संस्कृतीचे अमृत स्वीकारत आहे, जगातील सर्व विचार हे अर्धवट असून भारतीय विचार हा पूर्णत्वाचा आणि सहिष्णुतेचा आहे. मात्र विद्या व संस्कृतीच्या या माहेरघरातूनच विद्या व संस्कृती हद्दपार होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
यावेळी श्री माधव भांडारी यांनी सदर पुस्तकाची व लेखांची पार्श्वभूमी सांगितली तर श्री चंद्रकांत दादा पाटील व श्री केशव उपाध्ये यांनी देखिल या पुस्तकाबद्दल आपले विचार मांडले.
उत्कर्ष प्रकाशनने आजवर केलेल्या कार्याचेही कौतुक श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.