बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम तातडीने पूर्ण करा,अन्यथा तीव्र आंदोलन करणार ….खा . प्रतिभा धानोरकर यांचा प्रशासनाला इशारा

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.21 जून) :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे. बाबुपेठ उड्डाण पुलाच्या संदर्भाने काल खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांसह या प्रलंबित उड्डाण पुलाला भेट देत तेथील पाहणी केली.

खासदार धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठकांचे सत्र सुरु केले असून काल दि. 20 जुन रोजी दुपारी 04.00 वा. निर्माणाधीन असलेल्या व गत ८ वर्षांपासून रखडलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली.

यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत उड्डाण पुल जनतेच्या सेवेत सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. सदरहु पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरु असून या पुलाच्या अभावी अनेक नागरीकांना आपला प्राण गमवावा लागला ही वस्तुस्थिती आहे. उपरोक्त पुलाची प्रतिक्षा बाबुपेठ येथील जनतेला असून अधिकारी मात्र या कडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.