✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.26 जुलै) :- जिल्ह्यात पोंभूरणा तालुक्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या वेळवा माल येथील शेतशिवारातील ढेकलू रूषी कुडमेथे यांच्या शेतात धान रोवणी करण्याचे काम करणार्या शेतमजुरांवर वीज पडली. त्यात वडीलाच्या गावी शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सहा मजूर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.२६) , दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
अर्चना मोहन मडावी (वय २७), रा. सास्ती (गौरी ) ता. राजुरा असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींमध्ये खुशाल विनोद ठाकरे (वय ३०) रा.वेळवा माल, रेखा अरविंद सोनटक्के (वय ४५), सुनंदा नरेंद्र इंगोले (वय ४६) राधिका राहुल भंडारे (२०), वर्षा बिजा सोयाम (४७,) व रेखा ढेकलू कुडमेथे (वय ५५ ) सर्व वेळवा माल ता.पोंभूर्णा यांचा समावेश आहे.
यापैकी खुशाल विनोद ठाकरे याच्या शरीराचा डावा हिस्सा काही अंशी पॅरालाईस झाल्याने त्याला चंद्रपुर रेफर करण्यात आले आहे. वरील सर्व जण शेतकरी ढेकलू ऋषी कुडमेथे यांच्या शेतात धान रोवणीचे काम करीत होते. त्यांच्या बाजूच्याच शेतात खुशाल विनोद ठाकरे हे देखील बैल चारत असताना दुपारच्या सुमारास आभाळ भरून आले व पावसाला सुरवात झाली. त्यातच अचानकपणे वीज कोसळून अर्चना मोहन मडावी ही जागीच ठार झाली.
गंभीर जखमी असलेल्या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच तहसीलदार शिवाजी कदम तातडीने आपल्या महसूल कर्मचाऱ्यांसह ग्रामीण रूग्णालयात दाखल होत जखमींची आस्थेने विचारपूस केली.
पोंभूर्णा पोलीसह रूग्णालयात दाखल झाले होते.या आकस्मिक आलेल्या नैसर्गिक संकटाने वेळवा गावात हळहळ व्यक्त केली जात असुन तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.