बापरे . देवाच्या मंदिरात चोरी

🔸कल्पतरू गणेश मंडळाची दानपेटी घेऊन चोरटा फरार

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.14 सप्टेंबर) :- 

येथील गांधी चौकातील कल्पतरू गणेश मंडळाची दानपेटी गुरुवार दि.१२ सप्टेंबर च्या मध्यरात्रीनंतर चोरीला झाल्याची घटना शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये घटना कैद झाल्यामुळे काही तासातच मंडळाच्या सदस्यांच्या लक्षात हा प्रकार आला . आणि त्यांनी अल्पावधीतच चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

वरोरा येथील गांधी चौक परिसरातील प्रसिद्ध कल्पतरू गणेश मंडळाच्या पेंडॉल समोर काचेची दानपेटी ठेवलेली होती . गणपतीच्या दर्शनाला येणारे भावीक भक्त आपल्या इच्छेप्रमाणे या दानपेटीत पैसे टाकत. १२ सप्टेंबर पर्यंत या दानपेटीत आठ ते दहा हजार रुपये जमा झाले असावे असे म्हटले जाते.

दरम्यान सदर दानपेटी काचेची असल्याने त्यात जमा होणारी रक्कम बाहेरून स्पष्ट दिसत होती. यामुळे या दानपेटीवर चोरांची नजर होती. १३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने सदर दानपेटी उचलून पोबारा केला. त्याने ही दानपेटी पेंडॉलच्या मागे नेऊन फोडली आणि त्यातून निघालेली रक्कम घेऊन तो पसार झाला. दरम्यान काही व्यक्तींच्या लक्षात हा प्रकार येतात त्यांनी मंडळाच्या पेंडॉलमध्ये उपस्थित सदस्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली.

लगेच मंडळाच्या सदस्यांनी चोराचा शोध घेतला असता एका गल्लीत तो आढळून आला. त्याला लगेच ताब्यात घेऊन घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली व आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान चोरीच्या रकमेपैकी पाचशे व दोनशे रुपयांच्या नोटा चोराजवळ मिळून आल्या नाही. केवळ चिल्लर रक्कम आढळून आली. त्यामुळे सदर चोरीच्या घटनेत आणखी काही व्यक्तींचा समावेश असावा असावा असा अंदाज लावला जात आहे. 

मंडळाचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बिएनसी) कलम ३०४,३२४ नुसार आरोपी प्रशांत वाकुडकर रा. खांबाडा याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी जवळ दानपेटीतून चोरलेल्या रकमेपैकी ६००० रुपये आढळून आले . ते पोलिसांनी जप्त केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनात वरोरा पोलीस करित आहे.