बांगलादेश मध्‍ये हिंदुंवर होणारे अत्‍याचार त्‍वरीत थांबवावे…ना. सुधीर मुनगंटीवार

🔸सकल हिंदु समाजातर्फे आयोजित मोर्चात ना. मुनगंटीवार यांचा सहभाग

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 ऑगस्ट) :- बांगलादेश मध्‍ये सत्‍ताबदल झाल्‍यावर ताबडतोब त्‍या देशातील काही अराजक तत्‍वांनी तेथील अल्‍पसंख्‍यांक समाजावर त्‍यातही विशेषतः हिंदु समाजातील लोकांवर अत्‍याचार करण्‍यास सुरूवात केली. ज्‍यामध्‍ये घरोघरी जावून त्‍यांना मारपीट करणे, त्‍यांची घरे जाळणे, त्‍यांच्‍या व्‍यवसायाच्‍या जागेवर तोडफोड करणे, महिला व मुलींना त्रास देणे अशा गोष्‍टींचा समावेश आहे.

आता तर बांगलादेश मध्‍ये सरकारी नोकरीत असणा-या हिंदुंना जबरदस्‍तीने नोकरी सोडण्‍यास भाग पाडले जात आहे. यासर्व कृतीचा मी कडाडून निषेध करतो, असे प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर मध्‍ये सकल हिंदु समाजातर्फे बांगलादेश मध्‍ये या घटनेचा निषेध करण्‍यासाठी एका मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले होते. 

चंद्रपूरात आज बांगलादेशमध्‍ये हिंदुवर होणा-या अत्‍याचाराविरूध्‍द एका भव्‍य मोर्चाचे आयोजन सकल हिंदु समाजातर्फे करण्‍यात आले होते. या मोर्चात हजारोंच्‍या संख्‍येने नागरिक उपस्थित होते. विशेष म्‍हणजे या मोर्चात हिंदु व्‍यतिरिक्‍त मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, सिख, जैन, समाजाचे नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, विहीपचे जिल्‍हाध्‍यक्ष रोडमल गहलोत, देवराव भोंगळे, रणजित सलुजा, वसंतराव थोटे, अशोक हासानी, शैलेश बागला, रामकिशोर सारडा, राहूल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, मनोहर टहलियानी, अजय मामीडवार, प्रकाश देवतळे, पराग दवंडे, रघुवीर अहीर प्रामुख्‍याने उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले, बांगलादेश मध्‍ये हिंदुंवर होणा-या अत्‍याचाराच्‍या विरूध्‍द निघालेला हा मोर्चा हा एकतेचे प्रतीक आहे. सर्व देश एक आहे या भावनेने जात,धर्म विसरून सर्व समाज या मोर्चात सामील झाला ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. 

भारत सरकारने या बाबतीत तातडीने पाऊले उचलावीत व बांगलादेश मध्‍ये हिंदुंवर होणारे अत्‍याचार त्‍वरीत थांबविण्‍यासाठी बांगलादेश सरकारशी उच्‍चस्‍तरीय चर्चा करून हा प्रश्‍न सोडवावा, असेही प्रतिपादन ना. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी केले. यावेळी महामहीम राष्‍ट्रपती, मा. पंतप्रधान, मा. गृहमंत्री, मा. मुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र, मा. उपमुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र यांच्‍या नावाने निवेदन अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना शिष्‍टमंडळातर्फे देण्‍यात आले.