पेट्रोल पंपावर ‘मोफत हवा’ केवळ नावालाच

🔸वाहनचालकांच्या खिशाला कात्री: यंत्र खराब असल्याचे देतात कारणे

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.4 मार्च) :- वरोरा, चिमूर- 353 ई महामार्गावरील शेगाव पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी वाहनचालकांना वाहनामध्ये हवा भरण्यासाठी मोफत सेवा असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्याचा उलटाच अनुभव वाहनचालकांना येत आहे.

शेगाव हे वरोरा तालुक्यातील मुख्य गाव म्हणून ओळख असून या गावची लोकसंख्या दहा हजारच्या वर आहे या ठिकाणी समोरला मोठा बाजार भरत असून परिसरातील 60 ते 70 खेडे या बाजारपेठेला जोडलेली आहे या ठिकाणी रोज परिसरातील शेतकरी, नागरिक विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक दळणवळण, दवाखाना, बँक व्यवहार, गरजू साहित्य घेण्याकरीता येत असतात.

वरोरा, शेगाव, चिमुर 353 ई राष्ट्रीय महामार्गावर दोन पेट्रोल पंप आहे या ठिकाणी मोफत हवा केंद्र मात्र नामशेष झालेले आहे, या ठिकाणी मोफत हवा केंद्र वाहनचालकांच्या नजरे आड ठेवण्यात आलेले आहे तेही बंदच अवस्थेत तिथे कर्मचारी तर नाहीच नाही. कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता हवा भरण्याचे यंत्रणा बंद असल्याचे सांगण्यात येते. एकंदरित पेट्रोल पंपचालक एकीकडे इंधन विक्रीतून अव्वाच्या सव्वा नफा मिळवत असतांना सुविधांबाबत मात्र चालढकल करतांना दिसत असल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून केल्या जात आहेत.

 पेट्रोल भरल्यानंतर वाहनधारकांना हवा भरण्यासाठी खासगी दुकानाचा आधार घ्यावा लागत असल्याने गाडीत हवा भरण्याच्या माध्यमातून जास्तीच्या आर्थिक दंड वाहनधारकांना बसत आहे तिथे पंक्चर काढण्याची सोय असून, त्यांच्याकडून हवा भरण्यासाठी विशिष्ट रक्कम अदा करावी लागत असते. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असल्याने संबंधित विभागाने अशा पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. 

मार्च महिन्याची सुरुवात झाली असून उन्हाळ्याची सुद्धा तीव्रता वाढली आहे तसेच लग्न समारंभाचे कार्यक्रम सुद्धा सुरू झाले असून दिवसा,रात्री प्रवास करताना वाहनधारकांना हवेची आवश्यकता असते परंतु पेट्रोल पंपावर हवा केंद्र नसल्यामुळे खासगी दुकानाचा आसरा घेत हवा भरावी लागत आहे.

पुरवठा विभागाचे दुर्लक्ष पथ्यावर :- 

शेगाव पेट्रोल पंपावर ही असुविधा पाहायवास मिळत असल्याने वाहनचालकांत संताप आहे. सर्व पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी यंत्र लावण्यात आली आहेत. अनेक वेळा ते यंत्र खराब असल्याचे सांगण्यात येत असते. यामुळे गाडी पंक्चर झाल्यास ढकलत न्यावी लागते. कधी- कधी हवाही व्यवस्थित भरली जात नाही. पेट्रोल पंपावर अशाप्रकारे वाहनचालकांना त्रास देणाऱ्या पेट्रोल पंपचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत पुरवठा विभागाकडूनही डोळेझाक होत असल्याचे वाहनचालक सांगत आहेत.