🔹 चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे जवाब दो मोदी जवाब दो आंदोलन
✒️शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.18 एप्रिल) :-
पुलवामा घटनेत सी.आर.पी.एफने हेलिकॉप्टर्सची केंद्र सरकारकडे मागणी केली. परंतु, गृहमंत्रालयाने हेलिकॉप्टर्स देण्यास नकार दिला. यामुळे जवानांना रस्ते मार्गाने निघावे लागले. त्यात ४० जवानांचा नाहक बळी गेला.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मल्लीक यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. एकंदरित, केंद्र सरकारची निती बघता पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यू ला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर जवाब दो मोदी, जवाब दो आंदोलन घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात सोमवारी १७ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर येथे कस्तुरबा चौकात जवाब दो आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार धानोरकर बोलत होते.
खासदार धानोरकर पुढे म्हणाले, पुलवामा हल्ल्यात वापरल्या गेलेल्या स्फोटकांची माहिती अद्यापही मिळालेली नाही. याबाबत सीबीआयने काय अहवाल दिला, हे अजुनही गुलदस्त्यात आहे. देशाचा पैसा लुटून नेणाऱ्या भगोड्यांना एका जाहिर सभेत राहुलजी गांधींनी चोर म्हटले. त्यामुळे सुरतच्या उच्च न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.
मोदींनी मोठ्या तत्परतेने राहुलजींची खासदारकी रद्द करुन सरकारी घरदेखील खाली करण्यास सांगितले. या प्रकरणात अपिलसाठी ३० दिवसांचा अवधी असूनही, केंद्र सरकारने एवढी घाई कशासाठी केली, हा मह्त्वाचा प्रश्न आहे. हिडनबर्ग रिसर्च या वित्तिय संशोधन संस्थेने अदानी समूहावर केलेल्या अहवालावर चौकशी व कारवाई का करण्यात आलेली नाही.
सरकारी वित्तिय संस्था व एल.आय.सी. वर अदानीची मदत करण्यासाठी दबाव का? अदानीची एवढी मदत का करता? आयपीओला मोठा प्रतिसाद मिळून सरकारला विक्रितून २० हजार ५५७ कोटी मिळाले. त्याचे काय केले? या सर्व घोटाळ्यांच्या चौकशीची कॉग्रेसने मागणी केली.
काँग्रेसचे संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) चौकशी ची मागणी केली तर जाणून बुजून संसद स्थगित करीत टाळाटाळ सुरु आहे. परंतु, केंद्र सरकार का टाळाटाळ करत आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देशातील जनतेला हवी आहेत.
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान, अदानी समूहाकडे आलेले कोट्यवधी रुपये, काळे कायदे रद्द करण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे मृत्यू, या सर्व प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने देशातील जनतेला द्यावी, यासाठी काँग्रेसच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रदेश पदाधिकारी विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ नेते के. के. सिंग, प्रविण पडवेकर, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, प्रवीण पडवेकर, प्रीती शहा, इरफान शेख, मनोज खांडेकर यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन ओबीसी विभागाचे प्रदेश पदाधिकारी प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी केले.