पावसाळ्यातील संभाव्य संकटापूर्वी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी यंत्रणेला केले अलर्ट

🔹पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दाखविली तत्परता

🔸चंद्रपूर जिल्ह्याला पुराच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर,(दि.7 मे) :-  गेल्या काही वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झाले. या पुरामुळे फटका बसलेल्या गावांना पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून तात्काळ मदतही मिळाली. पालकमंत्री यांनी दाखविलेले गांभीर्य आणि तत्परता कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. आता निवडणुकीच्या धामधुमीतही ना. श्री. मुनगंटीवार आपली जबाबदारी पार पाडत असून त्यांनी पावसाळ्यातील संभाव्य संकटापूर्वीच यंत्रणेला अलर्ट केले आहे.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून यापूर्वीच्या पुरांचे संदर्भ देताना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकत्वाची जाणीव ठेवत यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेला पूर कोणीही विसरेलेले नाहीत. या पुरामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागला होता.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ना. श्री. मुनगंटीवार यांनी पालकमंत्री म्हणून युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या होत्या. त्यांनी स्वतः पूर्णवेळ लक्ष देऊन नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. परंतु, पुन्हा एकदा अशापद्धतीचा धोका उद्भवणार नाही, यासाठी यंत्रणेने सर्व उपाययोजना आधीच करण्याची गरज असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. 

‘चंद्रपूर शहरालगतच्या इरई व झरपट या नद्या वर्धा नदीस मिळतात. पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असून या नद्यांना पूर येऊन चंद्रपूर शहरात पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत. ईरई व झरपट या दोन्ही नद्यांमध्ये गाळ व झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. अशाने पात्राची खोली कमी होऊन पुराचा धोका वाढू शकतो,’ असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

खोलीकरण करण्याच्या सूचना :- 

शहरालगतच्या नद्यांचे खोलीकरण करणे तसेच शहरालगतच्या नद्यांवर सुरक्षा भिंत उभी करणे ही कामे होणे अत्यंत आवश्यक आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव अनुभवी सल्लागार संस्थांमार्फत करून राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत केंद्र सरकारकडे सादर करावा, अशा सूचना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.