पदाधिकारी नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार

🔹भद्रावती नगरपालिकेचे शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.17 जुलै) :- भद्रावती नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून जवळपास एक वर्षाचा कालावधी झाला. मात्र, अद्यापही नगरपरिषदेच्या निवडणुका घेण्यात न आल्याने प्रशासकराज सुरू आहे. पदाधिकाऱ्यांचा दबाब नसल्याने नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली असून शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. परिणामी, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

शहरात सुखसुविधांच्या अनेक समस्या निर्माण झाल्याने पदाधिकाऱ्यांचे महत्त्व काय असते, हे नागरिकांना समजायला लागले आहे. पदाधिकाऱ्यांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वचक असतो. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण अगदी सहजपणे होते.

मात्र, पदाधिकारी नसल्याने नागरिकांच्या समस्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील मुख्य मार्गावरील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीला शहरातील मुख्य रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी शहरातील नागरिक आपापल्या भागातील समस्या आपल्या नगरसेवकांच्या लक्षात आणून द्यायचे व नगरसेवक या समस्यांनाचा पाठपुरावा करून लगेच नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करायचे.

यामुळे नागरिकांना दिलासा मिळायचा. मात्र, आता पदाधिकारीच नसल्याने शहरात समस्यांचा डोंगर उभा झाला असून सामान्य नागरिकांच्या लहान, मोठ्या समस्यांकडे अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन लागत आहे. आधी पदाधिकारी असतांना शहरातील समस्यांकडे कटाक्षाने लक्ष दिले जायचे. महिन्याभरातून एकदा तरी पदाधिकारी स्वतः हाती झाडू घेऊन शहरात स्वच्छता मोहीम राबवायचे.

या उपक्रमामुळे स्वच्छतेच्या बाबतीत पालिकेला अनेक बक्षिसे मिळाले. मात्र, आता अधिकाऱ्यांकडून शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ या संकल्पनेला धक्का बसला आहे. शहरात मोकाट गुरांचा त्रास वाढलेला आहे, मोकाट गुरे शहरात सर्वत्र रस्त्यावर बसून किंवा उभी आढळतात. अंधारात हे गुरे दिसून येत नसल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे.

मात्र, या मोकाट गुरांच्या बंदोबस्ताकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. एक ना दोन अनेक समस्या भद्रावती शहरात पाहायला मिळतात, या समस्यांमुळे नागरिकांचे जीवन सुसह्य होण्याऐवजी असह्य झालेले आहे. या समस्यांकडे भद्रावती पालिकेचे लक्ष जाणार काय, असा प्रश्न भद्रावती शहरातील नागरिक विचारू लागले आहे.