✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे (दि.3 जानेवारी) :- भोसरी येथील लेखक, प्रवासवर्णनकार संदीप राक्षे यांना विविध देशांत प्रवास करून प्रवास वर्णन लिहिल्याबद्दल नेपाळ येथील गांधी पीस फाऊंडेशन व ज्ञान ज्योती शांती अभियान या संस्थेच्या वतीने बुधवार दि २७ डिसेंबर २०२४ रोजी नेपाळचे उपराष्ट्रपती परमानंदजी झा यांच्या शुभहस्ते “आंतरराष्ट्रीय प्रवासवर्णनकार” हा किताब देण्यात आला. या प्रसंगी नेपाळचे योगगुरू चंद्रकुमार शेरमा, जागतिक बुदिष्ट गुरू घ्यँचो रिपोन्चे व गांधी पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष लालबहादूर राणा हे उपस्थित होते.
हा भव्य दिव्य सोहळा नेपाळ येथील काठमांडू शहरातील काठमांडू विद्यापीठात संपन्न झाला. संदीप राक्षे यांनी महाराष्ट्रातील अनेक अपरिचित पुरातन वास्तूंना भेटी देऊन त्या सुपरिचित करण्याचा विडाच उचलला होता. प्रत्येक प्रवास वर्णनाचा प्रसंग अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने, सौंदर्यदृष्टीने आपण आपल्या सुंदर आणि ओघवत्या अशा लेखन शैलीतून साकारले. आपल्या या सुंदर वर्णनाच्या, सुंदर विचारांच्या शब्दसागरात डुंबून वाचक आनंदाच्या लाटांमध्ये चिंब भिजून जातो. अशा प्रवासवर्णनासाठी अनेक संस्थांनी संदीप राक्षे यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला होता.
कर्नाटक, हिमाचल, उत्तराखंड, मेघालय, अरूणाचल प्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांचा प्रवास करून, प्रत्येक राज्यातील पर्यटन स्थळांचे संदीप राक्षे यांनी प्रवासवर्णन लिहून ते अनेक वाचकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले त्याबद्दल नुकताच गोवा सरकरच्या कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राष्ट्रीय प्रवासवर्णनकार हा पुरस्कार देण्यात आला होता. बँकाॅक, थायलंड, पटाया अशा आंतरराष्ट्रीय स्थळांचे लिहीलेले प्रवासवर्णन विशेष गाजले.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शाळांनी आपल्या विद्यार्थांना हे प्रवासवर्णन वाचून दाखवले त्यामुळे विद्यार्थांच्या ज्ञानात भर पडली, घर बसल्या आंतरराष्ट्रीय प्रवास वर्णनाचा अनुभव मिळाला. अशा अनेक प्रवास वर्णनाची दखल घेऊन नेपाळ येथील गांधी पीस फाऊंडेशनने संदीप राक्षे यांना आंतरराष्ट्रीय प्रवासवर्णनकार हा किताब दिला.