🔸घराला लागलेल्या आगीत सर्वस्व गमावलेल्या पवार कुटूंबिय रस्त्यावर
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर.(दि.22 एप्रिल) :- शिक्षण घेऊन नोकरी मिळवली. आयुष्याशी संघर्ष करत कष्टाने संसार उभा केला. पत्नीनेही संघर्षात साथ दिली. आता सारेकाही सुरळीत सुरू असतांना सुखी संसाराला दृष्ट लागावी असे घडले. आणि घराला लागलेल्या आगीत डोळ्यांदेखत सुखी संसाराची राख रांगोळी झाली. आतापर्यंत कष्टाने मिळविलेले सारेकाही डोळ्यांदेखत गमावले. त्यामुळे हतबल झालेल्या पवार कुटूंबाने आता जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला.
दिवसागणिक तापमान वाढत आहे. सुर्य आग ओकू लागला आहे. अशातच बुधवारी दि. १७ एप्रिलला सायंकाळी ५ च्या दरम्यान तांडा (ता.भद्रावती) येथील धोंडिबा पवार यांच्या घराला आग लागली. आगीचा जोर वाढतच गेला. काही कळायच्या आतच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. यावेळी धोंडिबा पवार हे गावातील घमाबाई प्राथमिक आश्रम शाळा येथे होते. तर मुले भद्रावती येथे बाजार करण्यासाठी गेले होते.
परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. राहते घर, अन्नधान्य, चिजवस्तू, कागदपत्रे आगीत भस्मसात होतांना उघड्या डोळ्यांनी हतबल होवून पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. एका क्षणात सारे काही संपले होते. मेहनतीने उभ्या केलेल्या तीस वर्षांच्या संसाराची राखरांगोळी झाली होती. अंगावरचे कपडे तेवढे उरले होते.
मुळचे जीवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील असलेले धोंडिबा पवार हे तांडा येथील घमाबाई प्राथ. आश्रम शाळा येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत. नोकरीच्या निमीत्ताने आले आणि तांडा येथे स्थायिक झाले. बुधवारी सायंकाळी लागलेल्या आगीत सर्वस्व गमावलेल्या धोंडिबा, त्यांची पत्नी विमल, मुलगी प्रतिक्षा (२४), मुलगा प्रज्वल (२२) हे अजुनही या दु:खातून सावरले नाहीत. घटनेनंतर संबंधित तलाठी यांनी पंचनामा केला. मात्र अजुनही शासनस्तरावर मदत मिळाली नसल्याचे पवार कुटूंबियांनी सांगितले.
नोकरीच्या निमीत्ताने स्थायिक झाले असल्याने पै-पै जमा करून मोठ्या हौसीने राहण्यासाठी घर बांधले होते. दोन्ही मुलांना उच्चशिक्षण दिले. तसेच मुलीच्या लग्नासाठी म्हणून आधीच सोने खरेदी करून ठेवले होते. मात्र या आगीत मुलांची शैक्षणिक कागदपत्रे, सोने, पैसा सर्व डोळ्यांदेखत नष्ट झाले. घरही राहण्याच्या लायकीचे उरले नाही त्यामुळे आता जगायचे कसे हा प्रश्न पवार कुटूंबियांसमोर उभा ठाकला आहे.