✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.4 जुलै) :-भद्रावती विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी व रोजगार निर्मितीसाठी तत्कालीन सरकारने सन १९९४-९५ मध्ये भद्रावती एम.आय.डी.सी. अंतर्गत निप्पॉन डेन्डो (सेन्ट्रल पावर इंडिया कंपनी) इस्पात ग्रुप या कंपनीला विकास प्रकल्पा करिता जागा देण्यात निश्चित आली.
त्यानुसार या कंपनीने भद्रावती तालुक्यातील गवराळा, चीरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, चारगाव, विजासन, लोणार रिठ, रुयाळ रिठ, इत्यादी गावातील शेतकऱ्यांची एकूण २९४७ एकर जमीन १४ ते १६ हजार रुपये प्रती एकर अशा कवडीमोल भावाने अधिग्रहण करण्यात आली यात शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यात आले मात्र ही शासनाने आमच्या शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आमच्या जमिनीवर विकास प्रकल्प होणार आणि आपल्याला नोकऱ्या मिळणार या आशेवर आमचा शेतकरी बांधव होता मात्र २८ वर्षे होऊन देखील याठिकाणी प्रकल्प उभा राहू शकला नाही त्यात प्रत्येक सरकारने आमच्या बांधवांच्या तोंडाला पाने पुसली आहे.
प्रकल्प सुरु न झाल्यामुळे जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे, ती जमीन ते अजूनही कसत आहे. मात्र यावर शासकीय लाभ मिळत नाही आणि जमीन कवडीमोल भावाने जाण्याची भीती आहे . यात शेतकऱ्यांच्या नोकरी व शिक्षणाच्या अभावी दोन पिढ्या बरबाद झाल्या असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शेतकरी बांधव त्यांच्या उपजीविकेसाठी या जमिनीवर उत्पन्न घेत असून ही जमीनच त्यांच्या पोट भरण्याचे साधन आहे. मात्र आता नवीन कंपनीच्या माध्यमातून या जमिनिवर प्रकल्प सुरु झाल्यास आपली फसवणूक होत आहे ही भावना आमच्या शेतकऱ्यांची आहे. हा प्रकल्प सुरु झाला तर आपण आता जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. सुरवातीलाच प्रकल्प सुरु झाला असता तर नोकरी मिळाली असती व ती त्या शेतकरी बांधवांच्या जगण्याचे साधन झाले असते व आपले जीवनमान सुधारले असते अशी भावना या गावातील शेतकऱ्यांची आहे.
याकरिता ज्या प्रकल्पासाठी या गावातील जागा घेतली तो प्रकल्प वेळेत सुरु होऊ न शकल्याने सदर जमिनीचे नव्याने भूसंपादन प्रक्रिया करून प्रकल्प चालू करावा अशी भावना तेथिल ग्रामस्थांमध्ये आहे.
या दृस्ठीने चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत शेतकरी, कंपनी अधिकारी व MIDC चे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किशोर टोंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मूनगंटीवार यांच्याकडे केली असून त्यांच्याकडून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी भावना व्यक्त केली.