ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर शेतकऱ्यांना ई-केवायसीकरिता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

🔸मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी काही तासांत घेतली दखल

🔹नुकसान भरपाई मिळण्यासाठी निर्माण झाली होती अडचण

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2ऑगस्ट) : – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर काही तासांमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांनी निर्णय घेतला. तात्काळ दखल घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना ई-केवायसीकरिता १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना काही शेतकरी बांधवाकडून निवेदन प्राप्त होताच त्यांनी मंत्र्यांना पत्र लिहिले. २०२३-२४ मधील अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पीक वाहून गेले. संपूर्ण शेत पाण्याखाली आले. अश्या परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी पात्र असतानाही अडचण निर्माण झाली होती. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. आणि अपुऱ्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अवघड आहे, अश्याप्रकारचे निवेदन अनेक शेतकऱ्यांकडून ना. श्री. मुनगंटीवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाले होते.

या सर्व निवेदनांची दखल घेऊन ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांकडे वेळ अपुरा असल्यामुळे ई-केवायसीकरिता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. आपण या प्रक्रियेकरिता मुदतवाढ द्यावी, असे पत्र ना. श्री. मुनगंटीवार यांनी मुदत व पुनर्वसन मंत्र्यांना लिहिले होते. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पत्राची काही तासांतच दखल घेण्यात आली आणि ई-केवायसीकरिता १५ अॉगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ना. मुनगंटीवारांच्या तत्परतेमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात येणारी मोठी अडचण दूर झाली आहे.