✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)
वाघेडा (दि.19 डिसेंबर):-क्रीडा स्पर्धा या ग्रामीण भागात चैतन्य निर्माण करते. गावागावांतील तरुण पिढी ही व्यसनाधीनतेच्या आहारी जावू नये. नविन पिढी व्यसनाधीन नव्हे तर विधायक ठरावी. ट्रस्टच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी कार्य केल्या जात आहे. आपल्या परिसरात आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी कोणतीही गरज भासल्यास ट्रस्ट सोबत संपर्क साधावा. मी तुमच्या पाठीशी आहे, असे रवि शिंदे म्हणाले.
भद्रावती तालुक्यातील तिरवंजा (मोकासा) येथे स्व. संकेत सुमटकर स्मृती प्रित्यर्थ जय भवानी क्रीडा मंडळ द्वारा आयोजित पुरुषांचे भव्य खुले कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सामन्यांचे उद्घाटन आज (दि.१९) ला स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मंचावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे, सरपंच अर्चना साव, माजी जि.प. सदस्य यशवंत वाघ, उपसरपंच प्रशांत कोपुला, ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर ताजने, डॉ. नरेंद्र दाते, देवराव येरगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी भास्कर ताजने, यशवंत वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. भास्कर ताजने म्हणाले की, कबड्डी हा मर्दाचा खेळ आहे. खेळात गालबोट लागणार नाही, याची काळजी खेळाडूंनी घ्यावी. गावात सौख्य नांदावे यासाठी या क्रीडा स्पर्धा आहेत.स्पर्धेत परिसरातील अनेक कबड्डी संघ सहभागी झाले तर मोठ्या संख्येने गावकरी व युवक उपस्थित होते.