दूध उत्पादन वाढीसाठी मुरघास लागवडीला चालना Promotion of poultry farming to increase milk production

🔹जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक (Demonstration in the presence of Collector)

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर( दि. 28 एप्रिल) :-     

           जनावरांना रानात चराई बंदी असल्याने त्यांना पौष्टिक चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. आजच्या या युगात सर्वच जनावरांना घरच्या घरी चारावं लागतं. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसावी लागत आहे त्यामुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. चराई क्षेत्र नाही, पौष्टिक चारा नाही. परिणामी दुधाळू जनावरांना समतोल आहार मिळत नसल्याने दुधाच्या उत्पादनात घट येतांना दिसते. म्हणूनच कृषी विभागाने जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मक्कापासून मुरघास चारा बनविण्याच्या उपक्रम हाती घेतला.

मौजा अजयपूर येथील विठ्ठल परसूटकर यांनी आपल्या शेतावर बाजरी लावली व कृषी विभागाच्या मार्गदर्शनात दोन टन मुरघास विशेष प्रशिक्षकाकडून तयार करून घेतले. या उपक्रमाची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अजयपूर येथे भेट देऊन प्रात्यक्षिक बघितले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरवळकर उपस्थित होते.

मुरघास चारा दुधाळू जनावरासाठी एक वरदान आहे. विशेषत: मक्यापासून बनविलेले मुरघास जनावरे मोठ्या चवीने खतात. त्यामुळे दुधाच्या उत्पादनात निश्चित वाढ होते. तसेच मुरघास सहा रुपये किलो दराने विकल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो.

मुरघास चा-यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईलच तसेच शेतक-यांनासुध्दा एक पूरक व्यवसाय उपलब्ध होईल, त्यामुळे शेतमालाच्या उत्पादनासोबतच जनावरांना पौष्टिक चारा उपलब्ध होण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी कृषी विभागाने शेतक-यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, कृषी पर्यवेक्षक श्री. बुगेवार व गावातील दूध उत्पादन करणारे शेतकरी उपस्थित होते.