ठाकरेंनी विधानसभा लढून आमदार होऊन दाखवावे

🔸चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

🔹उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून!

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि.30 सप्टेंबर) :- देवेंद्र फडणवीस यांची जमानत जप्त करण्याची भाषा बोलणारे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे, असे ते म्हणाले.

ते चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. श्री बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जिंकली नाही, आमदार म्हणून निवडून आले नाही. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मागच्या दरवाज्याने आमदारकी मिळवली. याउलट देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत, ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व कुणी स्वीकारायला तयार नाही. म्हणूनच त्यांचे आमदार बाहेर पडले.

ते म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे वाघ होते. हिंदू विचार महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनात जागवणारे बाळासाहेब ठाकरे याचे सुपुत्र उध्दव ठाकरे ही एकमेव ओळख त्यांची आहे. मात्र त्यांनी हिंदुत्वाचा विचार संपविला आहे. त्यामुळेच त्यांना काँग्रेस सोबत जावे लागले आहे. शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगवास भोगावा लागलेल्या अनिल देशमुख व दीडशे कोटींच्या भ्रष्टाचारच्या आरोपात आमदारकी गमावलेल्या सुनील केदार यांची सोबत त्यांना करावी लागत आहे. महाआघाडीने हार पत्करली आहे.

राहुल गांधीचा खोटेपणा घरोघरी सांगणार

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असे सांगितले. अमेरिकेत गेल्यावर आरक्षणाची गरज नाही असे सांगितले, त्यांचा हा खोटेपणा महाराष्ट्रातील प्रत्येक घरी जाऊन सांगणार आहोत. विरोधकांनी जनतेचा विश्वास गमावला असल्याचेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातील भगिणी सोडणार नाहीत.

     छत्रपतींचा एकेरी उल्लेख

सुनील केदार यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख एकेरी केला. ते बोलत असताना ठाकरे केवळ बघत राहिले, असा आरोपही श्री बावनकुळे यांनी केला.