जमत असेल तर धाडस करुन एक पाऊल पुढे टाकून बघा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.18 जानेवारी) :- काळं बदललाय आधी सारखं काहीच नाही . खूपच समोर आलोय आपण…अगदी बरोबर आहे सर्व . जुन्या घाणेरड्या रुढी परंपरां झुगारून नव्याने वाटचाल करतोय. अलीकडे काही समाजहितकारी विधवा स्त्रियांना हळदीकुंकू देऊन हळदीकुंकू देण्याचा सण फक्त सुवासिनीचाच या प्रथेचा विरोध करुन नवीन आगाज करतोय. समाज प्रबोधन करुन नवी दिशा देत आहे . 

                फक्त एका माणसाचे तिच्या आयुष्यातून अकल्पित जाण्याने तिचे तिच्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य संपवते का ? तिचे हाडामासाचे अस्तीत्व 

नाकारता येत नाही . तिचं हृदय,स्त्रीमन , भावना एकच. मला तर ती अगदी तुमच्यासारखी दिसते शरीराने, मनाने हुबेहूब प्रतिकृती. तुमच्या सारखीच आनंदात हसते आणि दुःखात रडते. फक्त ती एकटी आहे एवढाच फरक. पण बळ मात्र तुमच्यापेक्षाही जास्त आपल्या मुलांना सांभाळताना ती आई आणि बाबा दोन्ही असते बरं का. आता तुम्ही म्हणाल की, आम्ही तिला हळदीकुंकूत आमच्यात सामील करीत नाही का ? तिने हळदीकुंकू करावे वगैरे वगैरे…. मी कुठे असं म्हणतय. बदल नक्कीच होतं आहे . पण अंतःकरणातून स्वच्छ निष्पाप भावनेने बदल करा. तिच्या मागून फुसफुस करुन कानातल्या कानात होणारी कुजबुज थाबवा. उदा. विधवा आहे तरी वाण घेतले… हळदीकुंकू करते बाई ‌‌कश्याला पाहिजे आता हे सर्व वैगेरे वगैरे… तिला आवडते ना, करु द्या मग तिच्या मनासारखे अगदी सहजतेने . मिरवु द्या तिला अगदी तुमच्यासारखेच. आज ती जिथे आहे उद्या तुम्ही असाल कदाचित. तुम्हीही तिच्या आनंदात मनसोक्त आनंदी व्हा. बघा जग किती सुंदर आहे. 

                 हळदीकुंकू हे केवळ हळदीकुंकू नसते तर चारचौघीत हसण्या खिदळण्याचा मन मोकळे करण्याचा, दुःखाला विसरण्याचा एक बहाणा आहे. नव्या युगाचे गाणे गात एवढे समोर आलो आहोत ना . मग जमत असेल तर आणखी एक पाऊल पुढे टाकायचं धाडस करा . विधवा स्त्रीला अगदी मानाने कपाळावर हळदीकुंकू लावा. तिची ओटी भरुन वाण द्या. हळदीकुंकू आणि ओटी हे फक्त सुवासिनी साठीच ही प्रथाच मोडून टाका. गतकाळातील सती प्रथा , बालविवाह प्रथा अश्या अनेक समाजविरोधी प्रथा आपण मोडल्यास ना ? मग हळदीकुंकू आणि ओटी हा फक्त सुवासिनीचाच मान ही प्रथा पण मोडून बघा. सुवासिन आणि विधवा यामध्ये केवळ शाब्दिक फरक म्हणून दुर्लक्ष करा. पण एक स्त्री म्हणून दोघीही कोमल,नाजुक, फुलवती हळवी,भावनीक,लगेच अश्रू ढाळणारी पण वेळ आली तर दुर्गा होणारी अगदी सारखीच हे नाकारु नका ?  

       एकेकाळी ती तुमची मैत्रीण असेल. अनेक आनंदाचे क्षण तुम्ही सोबतीने साजरे केले असेल आणि आज केवळ नवरा नाही म्हणून तिला या छोट्या छोट्या सुखापासून दुर जाऊ देऊ नका. कदाचित ती स्वतः विरोध करेल , घाबरेल, जुन्या सुंदर आठवणी आठवुन तुमच्यापासून दुर जाण्याचा प्रयत्न करेल. आपण वेगळे आहोत ही भावना मनात ठेवून आतल्या आत स्वतःला दोष देईल. तिची धुसमट तिची घुसमट कुणाला कळणार सुध्दा नाही. एकटी एकाकी जीवनाला कंटाळून आत्महत्येचा विचार सुध्दा करेल. आपला मजबुत हात तिच्या समोर करा. नक्कीच तेवढ्याच विश्वासाने ती आपला हात तुमच्या हातात देईल. बदल होत आहे .फक्त तुम्ही एक पाऊल पुढे टाकने गरजेचे आहे. 

              अनेक आनंदाच्या समारंभात पाच सुवासिनी ओटी भरायला , सात सुवासिनी औक्षवत , ओवाळणी करण्यासाठी हव्यात .पण केवळ नवरा नसल्यामुळे तिचा सहभाग नको असतो . इथे सुध्दा जमत असेल तर एक पाऊल पुढे टाकण्याचं धाडस करा. फक्त तुमच्या सारखीच एक स्त्री म्हणून तिच्या कडे बघा . सुवासिनी.. सुवासिनी.. सुवासिनी करता, करता तिला किती कधीही भरुन न येणा-या जखमा आपण देत आहोत हे विसरु नका. शुभ -अशुभ कांहीही नसते . ” जो होने वाला है वो तो होके ही रहेगा ” मग त्या ठिकाणी कुणीही असो. 

                 श्रेया मला म्हणाली, आरती मी हळदीकुंकू करतेय. मी लगेच म्हटले श्रेया ,अभिनंदन स्वागत आहे तुझे. एक विधवा हळदीकुंकू करते लोक समोर कौतुक आणि मागे कुजबुज करतील , तू काहीतरी लिह. मी लगेच धाडस केले आणि एक पाऊल पुढे टाकले. बदल होत आहे आणि एक दिवस नक्कीच बदल होईल. फक्त समोर येणे गरजेचे आहे. जमत असेल तर धाडस करुन तुम्हीही एक पाऊल पुढे टाकून बघा .