जनावराची तस्करी करणारे 3 वाहने जप्त

🔸पाच आरोपींना अटक : 40 लाखाचा मुद्देमाल जप्त

✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.14 फेब्रुवारी) :- गुप्त माहितीच्या आधारे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागभीड हद्दीतून कांपा मार्गे तेलंगाणा राज्यात अवैधरित्या जनावरांची तस्कारी करणारी तीन आयचर वाहने पकडली आहे. ही कारवाई 14 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. पोलिसांनी तिनही वाहने ताब्यात घेवून एकूण 47 गोवंशाची सुटका केली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करून एकूण 40 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नागभीड हद्दीतून कांपा मार्गे 3 मालवाहू आयचर वाहनातून अवैधरित्या गोवंशाची तेलंगाणा राज्यात गोवंशाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांना मिळाली. याआधारे पोनि कोंडावार यांनी एक विशेष पथक नेमून कारवाई करीता नागभीड येथे रवाना केले. तसेच नागभीड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कोरवते, पोलिस उपनिरीक्षक साखरे यांना देखील याबाबत सूचना देण्यात आली.

दरम्यान या मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तसेच माहितीप्रमाणे बामणी बसस्टॉप समोर पोलिसांनी सापळा रचला होता. काही वेळातच कांपा मार्गे 3 आयचर वाहन येतांना पोलिसांना दिसले. पोलिसांनी तिनही वाहनांना थांबवून झडती घेतली असता वाहनांमध्ये एकूण 47 गोवंशीय जनावरे निर्दयीपणे कोंबुन भरण्यात आल्याचे दिसून आले.

पोलिसांनी सर्व गोवंशाची सुटका केली. तसेच आरोपी मोहम्मद कासीम मुस्तकीम शेख 46 रा. शिवानगर वॉर्ड नागभीड, समीर अक्रम खान 34 रा. जांभुळघाट ता. चिमूर, सैयद कोसार सैयद सालार 38 रा. मौलाना आझाद उर्दु शाळेजवळ मंगरुळपीर जि. वाशीम, अशो सदाशिव ठोंबरे 70 रा. बेलखेड ता. मंगरुळपीर जि. वाशीम, मोहम्मद मोहसीन मोहम्मद रफीक 32 रा. आसेगांव ता. मंगरुळपीर जि. वाशीम यांना अटक करण्यात आली. सर्व पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारीत 2015 सह कलम 11 (1) (ड) व प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा केला आहे. जनावरांची एकूण किंमत 4 लाख 70 हजार रुपये व तीन गाड्यांची किंमत 36 लाख रुपये असा एकूण 40 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात नागभीड पो.स्टे.चे सपोनि कोरवते, पोउपनि साखरे, स्थागुशचे पो.हवा. सुरेंद्र महतो, नापोकॉ दीपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, गणेश भोयर, विनोद जाधव आदींनी केली. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहे.