चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी सुविधा द्यावी

🔸ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

🔹कृषी क्षेत्राला होणार या सोईसुविधेमुळे मदत 

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.30 जून) :- चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. देशाच्या चारही दिशांनी जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांसाठी चंद्रपूर हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यातच शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असून विविध प्रकारच्या कृषी निविष्ठा, बी-बियाणे, खते तसेच रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक होते.

सध्या खरीप हंगामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खते आणि बियाणांची आवक वाढली असून जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म, शेड आणि गोदामाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल आणि तडाली रेल्वे स्टेशनवर कृषी निविष्ठाचे आवागमन आणि खतांचा साठा चांगल्या प्रकारे जतन करून ठेवण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाही. येथे स्वतंत्र प्लॅटफॉर्म, शेड आणि गोडावून नसल्याने खते आणि बियाणांची नासाडी तसेच कृषी विषयक साहित्य सुस्थितीत ठेवण्यास अनेक अडचणी निर्माण होत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील शेतकरी तसेच कृषी क्षेत्रावर होत आहे.

रेल्वेने आलेले कृषी विषयक साहित्य, खते, बियाणे आदी बाबी रेल्वे स्टेशनवर उतरविल्यानंतर त्याचा पुरवठा जिल्ह्यात इतरत्र केला जातो. त्यासाठी चंद्रपूर, मूल आणि तडाली येथील रेल्वे स्टेशनवर स्वतंत्र प्लॅटफॉर्म, पावसापासून कृषी निविष्ठांचा बचाव करण्यासाठी उत्तम शेड आणि साठवणुकीसाठी गोडावूनची आवश्यकता आहे. या सोयीसुविधा येथे उपलब्ध करून दिल्या तर खते आणि बियाणे वाहतुकीदरम्यान वाया जाणार नाही तसेच त्यांची नासाडीसुध्दा वाचेल. सोबतच जिल्ह्यासाठी एक उत्कृष्ट पुरवठा साखळी निर्माण होऊन त्याचा फायदा लाभार्थी आणि कृषी क्षेत्राला होण्यास मदत मिळेल. 

शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या या विषयासंदर्भात चंद्रपूर, मूल आणि तडाली येथील रेल्वे स्टेशनवर सदर सुविधा उपलब्ध करून देऊन शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे केली आहे.