🔹शिवसेना ( उबाठा) गटाची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.29 जुलै) :- जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरु आहे.पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाहून जाण्याच्या मार्गावर आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रहाची मागणी शिवसेना ( उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे.निसर्गाच्या जलचक्रावर जिल्ह्यातील शेत हंगाम अवलंबून आहे.मात्र अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे.पिकांचे झालेले नुकसान बघून बळीराजाच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहे.नदी व नाल्याचे पाणी शेतात साचल्याने शेतपिक हातातून गेले आहे. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटामुळे बळीराजा पूर्णतः खचला आहे.
त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व तत्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा तसेच सर्व पिकांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना ( उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यासोबतच २०२३ – २०२४ वर्षातील पीक नुकसानीचे रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी,तसेच सरकारच्या घोषणेनुसार कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपयाची रक्कम जमा करून बळीराजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख अमित निब्रड,ज्येष्ठ शिवसैनिक तथा शिवदूत बंडू डाखरे,विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, शहर संघटक तथा माजी नगरसेवक किशोर टिपले,युवासेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव,ज्येष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे, गजू पंधरे,उपशहर प्रमुख मनीष दोहतरे,महेश जिवतोडे, पंकज खापणे,गजानन टोंगे , महादेव विधाते, रूपेश मोडक आदी उपस्थित होते.