🔸संतोष रावत यांच्या चिंतेत वाढ
✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.8 नोव्हेंबर) :- पक्षासाठी दिवस रात्र काम केल्यानंतरही काँग्रेसने ऐनवेळी पाठ फिरवल्याने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज काँग्रेससाठी आशा मावळणारा तर ठरणार नाही ना? अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावतुरे यांच्यामुळे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बुडणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिलाषा गावतुरे या पक्षासाठी दिवस-रात्र एक करून काम करीत होत्या. अलीकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाने डोके वर काढले. त्यामुळे अभिलाषा गावतुरे यांचा पत्ता कापला गेला. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. आता त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे. त्याचा फटका नक्कीच काँग्रेसला बसणार आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने संतोषसिंग रावत यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना काँग्रेसमधील निष्ठावान आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, असा आरोप आता होत आहे. रावत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसच्या अभिलाषा गावतुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. गावतुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसकडून सर्वच प्रकारच्या मार्गांचा अवलंब करण्यात आला. मात्र त्यांनी माघार घेतली नाही.
*रावत यांच्या चिंतेत वाढ*
अभिलाषा गावतुरे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. या बंडखोरीची धास्ती आता काँग्रेसन घेतली आहे. याशिवाय उमेदवार संतोषसिंग रावत यांच्या चिंतेमध्ये देखील या बंडखोरीमुळे वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसने अनेक निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. याचे मोठे नुकसान काँग्रेसला सहन करावे लागणार आहे. काँग्रेसचा विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळात विकासाचे प्रमाण शून्यच होते. आताही काँग्रेसचे अनेक मतदारसंघांमध्ये विकासाच्या नावाने बोंब आहे.
विकास कामांची कोणतीही यादी नसताना काँग्रेसने पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देणे अपेक्षित होते. मात्र असे न झाल्याने आता अभिलाषा गावतुरे यांच्यासारखे अनेक जण ऐन निवडणुकीच्या काळात बंडखोरीच्या तयारीत आहेत. गावतुरे यांनी उघडपणे उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.
मात्र काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मनापासून दुखावल्यामुळे काँग्रेसचा साथ नक्कीच सोडतील असं ठळक चित्र चंद्रपूर जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे प्रयत्न करूनही काँग्रेसला चंद्रपूर जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’ करता येणार नाही, असं आता ठामपणे बोललं जात आहे. परिणामी चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची वाट लागणार की काय, असे चित्र आहे.