🔹स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविन्द्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर
✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)
वाघेडा (दि.16 जानेवारी) :- स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा कोरोना काळापासून घेतलेले मानवसेवेचे व्रत अविरत सुरु आहे. एक हात मदतीचा हे ब्रीदवाक्य घेवून आत्मविश्वास बाळगा, हीच खरी आपली ताकद आहे असा संदेश देत “जिथे गरज, तिथे ट्रस्ट”, या संकल्पनेने ट्रस्ट कार्य करीत आहे. त्यामुळे समाजातील दीन-दुबळे, गरीब-गरजू, पिडीत-शोषित, शेतकरी-शेतमजूर, निराधार-दिव्यांग, महिला, होतकरू विद्यार्थी, गंभीर आजाराचे रुग्ण, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी किंवा मृत, लघुव्यावसाईक, आदींनी ट्रस्टच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी केले आहे.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर अंतर्गत श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, कै. म.ना. पावडे क्रीडा स्पर्धा, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, विदेही सदगुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आदी योजना कार्यान्वित आहेत.
या योजनांच्या माध्यमातून निःशुल्क कोविड केअर सेंटर, भव्य आरोग्य तपासणी शिबिर, रुग्ण उपचारसेवा मदतकार्य, कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक सहकार्य, दिव्यांगांना निःशुल्क सायकल वाटप, विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा, आत्महत्याग्रस्त, गरीब, गरजू शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील व निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, कोरोणाने मृत, आत्महत्याग्रस्त, गरीब, गरजू शेतकरी-शेतमजूर कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च, ग्रामीण जनतेमधे जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम, गावागावात अभ्यासिकेला पुस्तक भेट व आर्थिक सहकार्य, शेतकऱ्यांचे शेतीसंबंधीत साहित्य, जनावरे, आदींचे नुकसान झाल्यास आर्थिक सहकार्य, व्यसन मुक्त गाव अभियान, अवैध व्यवसाय मुक्त गाव अभियान, नैसर्गिक आपत्तीमधे मदत व सेवा, लघु व्यावसायिकांना प्रोत्साहनपर मदत, स्वाभिमानी व स्वावलंबी युवक योजना, बचत गट सक्षमीकरण व महिला उत्थान कार्यक्रम, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी, मृत नागरिकाच्या कुटुंबास आर्थिक सहकार्य आदी लोकोपयोगी कार्य सुरू आहेत.
या सर्व प्रकारच्या उपक्रमाचा गरजुंनी लाभ घ्यावा, करीता ट्रस्टला रीतसर पत्र द्यावे, ट्रस्ट मागणीची तात्काळ दखल घेवून गरजूंना लाभ पोहोचविणारा असे प्रा. धनराज आस्वले म्हणाले.मागील दोन वर्षात ट्रस्ट तर्फे हजारो गरजूंना लाभांन्वित करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागात मदतकार्य सुरू आहे.
आरोग्य शिबीर व जनजागृतीपर कार्यक्रम होत असतात. आर्थिक मदतीसह, प्रेरणा व सहानुभूती दिल्या जाते. आजचे युग धकाधकीचे आहे.महागाई, बेरोजगारी, आजार, नापिकी, नैसर्गिक व मानवनिर्मित आपदा आदी समस्या बोकाळल्या आहेत. यावर उपाय शोधले पाहिजे. कुणीही हताश होवू नये. जीवन एकदाच मिळते. आत्मविश्वास ठेवावा. खचून जावू नये. व जिथे सर्व मार्ग संपले असे वाटते तिथे ट्रस्ट सोबतीला आहे हे लक्षात घेवून ट्रस्टच्या सानिध्यात यावे. ट्रस्ट गरजुंची अवश्य मदत करेल, असे प्रा. धनराज आस्वले यावेळी म्हणाले.