✒️संतोष लांडे नागपूर(Nagpur प्रतिनिधी)
नागपूर(दि.7 सप्टेंबर) :- महाराष्ट्रात जैवविविधतेसह खनिज संपत्तीची विपुल प्रमाणात उपलब्धी आहे. विकासाच्या प्रक्रियेत उपलब्ध असलेल्या खनिज संपत्तीचा परीपूर्ण उपयोग करणे ही काळाची गरज आहे. याचबरोबर ज्या भागामध्ये ही खनिज संपत्ती आहे त्या जिल्ह्यांसाठी महसूलाच्या दृष्टीकोणातून याकडे आपण पाहिले पाहिजे. खनिज संपत्तीच्या माध्यमातून अधिकाधिक महसूल गोळा करण्यासाठी लिलाव प्रक्रीयेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव (खनिकर्म) इकबाल सिंग चहल यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य भूवैज्ञानकीय कार्यक्रम मंडळाची ६० वी बैठक आज नागपूर येथे संपन्न झाली. ‘भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर’ अतिरिक्त मुख्य सचिव (खनिकर्म) इकबाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस खनिकर्म संचालनालयाचे महासंचालक टी.आर.के.राव, संचालक श्रीमती अंजली नगरकर, भारतीय भूवैज्ञानिय सर्वेक्षणचे निर्देशक नवजीत सिंग नय्यर, परमाणु खनिज निदेशालय (AMD) चे निर्देशक मन्थनवार आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. चहल यांनी याबैठकीत दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
खनिकर्म विभागाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी तंत्र कुशलता संपादन करण्यासमवेत आर्टीफिशीयल इंटेलिजन्सबाबत प्रशिक्षण घेतले पाहिजे. याचबरोबर खनिज संपत्तीच्या शाश्वत विकासाकडे देखील लक्ष पुरवणे आवश्यक असून भूवैज्ञानकीय कार्याचा समाजाच्या सर्व थरांपर्यंत उपयोग व्हावा असे प्रतिपादन महासंचालक टी.आर.के.राव यांनी केले. भूविज्ञान व खनिकर्म नागपूरच्या संचालिका श्रीमती अंजली नगरकर यांनी महाराष्ट्रात करण्यात आलेल्या खनिज सर्वेक्षण व समन्वेषण कार्याचा आढावा विषद केला. नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात चुनखडक, नागपूर जिल्ह्यात कायनाईट-सिलीमनाईट तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रवण व मठ क्षेत्रात बाँक्साईट खनिजाची उपलब्धता निदर्शनास आलेली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
नवजीत सिंग नय्यर, निर्देशक, भारतीय भूवैज्ञानिय सर्वेक्षण (GSI) यांनी मागील वर्षी व या वर्षी प्रस्तावित कार्यात GSI ने प्रामुख्याने तांबे, बाँक्साईट, Rare Earth Element (REE) या खनिजांचे पूर्वेक्षण करण्यावर भर दिलेला आहे असे सांगितले. परमाणु खनिज निदेशालय (AMD) चे निर्देशक श्री.मन्थनवार यांनी महाराष्ट्रात सदर यंत्रणेचा गोंदिया व छत्तीसगढ च्या सीमाक्षेत्रावर बिजली रायोलाईट या भूस्तरामध्ये युरँनियम खनिजाची पूर्वेक्षण योजना प्रस्तावित असल्याची माहिती दिली.मिनरल एक्स्प्लोरेशन व कन्सल्टन्सी लि. (MECL) चे श्री.प्रदीप कुलकर्णी यांनी MECL द्वारा त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील मिरगाव खंडामध्ये पुर्वेक्षणाचे कार्य सुरु असल्याची माहिती दिली. MOIL चे श्री.शुभम अंजनकर यांनी महाराष्ट्रातील भंडारा व नागपूर जिल्ह्यातील चिखली, डोंगरी बाजार, कांद्री व बेलडोंगरी सतक या क्षेत्रामध्ये पूर्वेक्षणाचे कार्य सुरु असल्याची माहिती दिली.
जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हेलपमेंट अँड डीझाईन सेंटर,नागपूर (JNARDDC) चे मुख्य वैज्ञानिक श्री.प्रवीण भुक्ते यांनी त्यांच्याकडे बाँक्साईट खनिजावर भरपूर पूर्वेक्षण केलेले असल्याची माहिती दिली. ‘भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय’ व JNARDDC यामध्ये सामंजस्य करार करून JNARDDC कडील भूवैज्ञानिक अहवाल प्राप्त करवून त्यांचा खनिज लिलावामध्ये समावेश करता येईल असे त्यांनी सुचविले.
महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र (MRSAC) चे असोशिएट वैज्ञानिक श्री. अजय देशपांडे यांनी त्यांच्या विभामार्फत राबविलेल्या योजनांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने वेकोलीच्या खाणी satellite द्वारे प्राप्त नकाशावर आरेखने तसेच खरीप व रब्बी पिकांची नुकसान भरपाई मिळणेकरिता त्या हंगामातील satellite नकाशांचा अभ्यास करून सदर माहिती नागपूर जिल्हा प्रशासनास पुरविली असल्याची माहिती दिली. वेकोली व CMDPI चे अधिकारी श्री.ओम दत्त यांनी मागील वर्षी एकूण २० खाणीमध्ये ६८८३९.१० मीटर आवेधन केल्याची माहिती दिली तसेच या वर्षी ४० खाणीमध्ये १७३८२४.७० मीटर आवेधन प्रस्तावित असल्याची माहिती दिली.
या बैठकीला राज्य सरकार व केंद्र सरकारच्या भूशास्त्रीय पूर्वेक्षण व खनिकर्म संबंधित विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संचालक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय,नागपूर, बिभास सेन, उपमहानिदेशक, GSI, राम थापर, IBM, ओम दत्त बिजानी, वरिष्ठ व्यवस्थापक, CMPDI, आर कार्तिकेयन,व्यवस्थापक, CMDPI, वंदित व्यास, सहा.व्यवस्थापक, WCL, अजय देशपांडे, असोसीएट सायंटिस्ट, महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजन केंद्र (MRSAC) तसेच भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय प्रमुख श्रीराम कडू, प्रादेशिक कार्यालय, छत्रपती संभाजी नगर, एस.पी.आवळे, प्रादेशिक कार्यालय,नागपूर, इत्यादी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
उपसंचालक, रोषण मेश्राम यांनी सभेस उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले. भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातील वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय जोशी, भूवैज्ञानिक विशाल धांडे, कनिष्ठ भूवैज्ञानिक अर्पण गजबे, राहुल राठोड, ऋषिकेश डांगे, सचिन खरबड, शिवराम सानप, मंगेश मोरे, सुशील राजपूत, भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक राहुल साळवे, आवेधन अभियंता नवीन मिश्रा, वरिष्ठ लिपिक उदय मँडमवार व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सदर बैठकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.