कार व ट्रेलरच्या धडकेत एक रेल्वे मजूर ठार

🔹2 गंभीर : रेल्वे महाप्रबंधकाचा पहाणी दौरा

✒️ शिरीष उगे वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.29 जून) :- चांदा फोर्ट ते सौंदळ दरम्यान रेल्वे लाईनची पाहणी करण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक निनू ईपीएरा यांच्या ताफ्यातील सफाई कामगारांच्या कार (एम.एच 31 एइ 9351) ने समोरच्या ट्रेलर (जिजे 12 डीवाय 7244) ला धडक दिल्याने कारमधील सफाई कामगार सुरेंद्रसिंह चव्हाण (50) यांना आपला जीव गमवावा लागला तर व्यंकटेश त्रिनाथराव सरीपल्ली (55) व बबलू छोटेलाल दाभोर (56) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. ही घटना वरोरा नजीक टेमुर्डा येथे शुक्रवारी (दि.28 जून) ला दुपारी 3.30 च्या सुमारास घडली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनची पाहणी करून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक सलून गाडीने (अधिका-यांची विशेष रेल्वे गाडी) चांदा फोर्ट ते सौंदळ पर्यंत रेल्वेमार्गाची पाहणी करण्यासाठी दुपारी 1 वाजता निघाल्यावर त्यांचे सोबत आलेले हे सफाई कामगार नागपूरच्या दिशेने निघाले.

टेमुर्डा येथे पोहोचल्यावर समोर जात असलेल्या ट्रेलरने अचानक ब्रेक मारल्याने सफाई कामगारांचे वाहन ट्रेलरवर मागून आदळले यात सुरेंद्रसिंह चव्हाण यांचा मृत्यू झाला तर व्यकंटेश सरीपल्ली व बबलू दाभोर हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी व पोलीस दाखल झाल्यावर जखमींना नागपूर येथे तातडीने हलविण्यात आले. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.