✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी)
चंद्रपूर (दि.26 जून) :- गोंडपिपरी तालुका हा रेती तस्करीसाठी जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. या तालुक्यातील कुलथा रेती घाट तर एका राजकीय नेत्याच्या सरपंच व नाग्रिकांवरील वरील हल्ल्याच्या घटनेने मंत्रालयापर्यंत पोहोचला होता. एकंदरीत या ठिकाणी महसूल आणि पोलीस विभाग रेती तस्कारांचा प्रतिबंध करण्यात सपशेल अपयशी ठरले होते. मात्र जे पोलिस आणि महसूल विभागाला जमले नाही ते पीडब्ल्यूडी च्या एका कार्यकारी अभियंत्याने करून दाखविले आहे.
त्याच्या अनोख्या कार्यवाहीने रेती तस्करी केवळ थांबलीच नाही तर रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारे करण्यात आलेली ही जिल्ह्यातली पहिलीच अनोखी कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे.रेती तस्करांनी पीडब्ल्यूडी च्या निर्माणधीन फुलाचा आसरा घेत मोठ्या प्रमाणात रेती तस्करी चालवली होती. या पुलियाच्या खालील भागातून तस्करांनी आपली वाहने नदीत उतरवण्यासाठी रस्ता बनविला होता. कार्यकारी अभियंता मुकेश टांगले यांनी पुलाच्या ठेकेदाराला सांगून हा रस्ताच मोडीत काढला आहे. त्यामुळे आता या ठिकाणची रेती तस्करी सध्यातरी थांबल्याचे पाहायला मिळत आहे.
गोंडपिपारी तालुक्यातील कुलथा हा रेती घाट जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहत आलेला आहे. सहा महिन्यांपूर्वी याच कुलथा रेती घाटावर एका राजकीय गुंडाने रेती तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या सरपंच आणि तंटामुक्तीच्या अध्यक्षासहित काही गावकऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढविला होता. घाटावरच घडलेल्या या प्रकाराने त्यावेळी एकच खळबळ माजली होती.दरम्यान मुख्य आरोपी जरी अदृष्य झाला असला तरी या तस्कराचे साथीदार मात्र रेती तस्करी करण्यापासून थांबले नव्हते. मुख्य तस्काराच्या साथीदारांनी कूलथा रेती घाट संपूर्ण रिकामा करण्याचा जनु सपाटा चालविला होता.
स्टॉक शिल्लक च्या नावाखाली हा गोरखधंदा कुलथा रेती घाटावर राजरोसपणे सुरू होता. यामुळे प्रशासनात प्रचंड मनस्ताप पाहायला मिळत होता. तरीही महसूल विभाग आणि पोलीस विभाग मात्र सक्रिय होत नव्हते. त्यामुळे शेवटी सोनारानेच कान टोचावे तसे पीडब्ल्यूडी च्या कार्यकारी अभियंत्याने हे रेती तस्कर ज्या निर्माणआधीन पुलाचा वापर आपल्या तस्करीसाठी करत होते त्या पुल्याखाली बनवलेला मार्गच खोदून काढला. पीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंते मुकेश टांगले यांनी ही अनोखी शक्कल लढवली. पीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता टांगले यांनी पुलाचे ठेकेदार श्री पटेल यांना सांगून पुलिया खाली तस्करांनी बनविलेला रस्ताच खोदून काढला.
*क्षमतेपेक्षा चौपट उत्खनन*
या संदर्भात जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने ठेकेदार पटेल यांच्याशी बातचीत केली तेव्हा पटेल यांनी सांगितले की गेले कित्येक दिवसापासून तस्करांची मुजोरी सुरू होती. अवैध उत्खनन अनियंत्रित चालले होते. पुला खालून बनविलेल्या रस्त्याने पुलाच्या किमतीच्या दुप्पट रेतीसाठा तस्करांनी ओढला आहे. सध्या तरी पुलाखालील रस्त्यावरून होणारी रेती तस्करी थांबली आहे
.*आमिष दाखवून नवा मार्ग शोधणार*
वाघाच्या तोंडाला रक्त लागावे तसे घबाळाची सवय झालेल्या रेती तस्करांनी आता नवा रस्ता बनवण्याचा शोध सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घाटा च्या किनारी असलेल्या उमरे नामक एका शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता सबंधित शेतकऱ्याला रेती तस्करांकडून प्रचंड पैशाचे आमिष दिल्याचे वृत्त आहे. हे जरी खरे असले तरी कुठल्या आधारावर ही रेती तस्करी सुरू आहे? याची शहानिशा खनीकर्म विभाग का करत नाही?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. *खनिकर्म, महसुल आणि पोलीसांवर प्रश्नचिन्ह?*
रेतीसाठा शिल्लक आहे किंवा नाही? आणि तो कुठल्या स्वरूपात कुठे-कसा स्टॉक करून ठेवला आहे? याच्या सर्व नोंदी घेण्याचे अधिकार ज्या विभागाला आहेत त्या विभागांनी या कार्यवाहीकडे लक्ष का दिले नाही? हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. महसूल विभाग आणि पोलीस विभाग सुद्धा या रेती तस्करांशी जोडला गेला तर नाही ना? अशी शंका आता परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान आता पीडब्ल्यूडी ने केलेल्या कार्यवाही कडे तरी पोलीस आणि महसूल विभाग लक्ष देईल काय? याकडे सर्वांचे लक्ष आहे.