कापूस लागवड तंत्रज्ञानासह इतर विषयांवर शेतक-यांना प्रशिक्षण

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 मे) :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे इंडो कॉटन सेंटर ऑफ पीडीकेव्ही, एक्सलन्स फॉर कॉटन अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने कृषी संशोधन केंद्र, ऐकार्जुना (ता. वरोरा) येथे शेतकरी आणि कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले.

शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकरीता मान्सूनपूर्व तयारी तसेच कापूस लागवड तंत्रज्ञान, कपाशीचे बियाणे, बोंडअळी नियंत्रण इत्यादी विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, कृषिवाणी कार्यक्रमाच्या संचालिका संगिता लोखंडे उपस्थित होत्या. यावेळी श्री. तोटावार यांनी सोयाबीनच्या अष्ठसूत्री लागवडीवर व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. याप्रसंगी कृषी संशोधन केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार यांनी कपाशी पिकांचे लागवडीसाठी विविध वाण, व त्यांचे वैशिष्टये, कापूस लागवड तंत्रज्ञान, बोंडअळींचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. चर्चा सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरेसुद्धा देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांनी केले. यावेळी परिसरातील शेतकरी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते.