औषध विक्री दुकानांमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा विनयभंग 

🔹आरोपीला अटक

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.27 ऑक्टोबर) :- शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या एका औषध विक्री दुकानांमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा तिथेच काम करणाऱ्या एका पुरुषाने विनयभंग केला .यासंदर्भातील तक्रारीवरून वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच‌‌ खळबळ उडाली आहे.

    वरोरा शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका औषधी विक्री दुकानात एक पुरुष आणि एक तरुणी काम करते. सदर दुकानाला लागूनच औषधीचे साठा केंद्र आहे. या साठा केंद्रातून औषधी आणण्यासाठी दि.२३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तरुणीला पाठवण्यात आले असता त्याच दुकानावर काम करणाऱ्या एका पुरुषांनी मागे जाऊन तिचा विनयभंग केला. त्यामुळे ही तरुणी घाबरून गेली.

बाहेर येऊन तिने या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला केली. पोलिसांनी तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता चे कलम ७४ अन्वय गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरेने हालचाल करित पोलिसांनी आरोपीस शहरातील एका बियर बार मधून अटक केली. छोटू रामू गाडगे ४० वर्ष राहणार वरोरा असे आरोपीचे नाव असून पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गौरकार हे घटनेचा तपास करीत आहेत.

दरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच्या सुमारास सोडून दिल्यात आल्याच्या चर्चेसह वरोरा शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांना विचारले असता सदर कार्यवाही नियमानुसारच करण्यात आली अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली .