✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.6 ऑगस्ट) यंदा चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून वरोरा भद्रावती तालुक्यात सततच्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आमचा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून त्याला शासकीय मदतीची गरज आहे त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी भारतीय जनता पक्ष वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेतृत्व किशोर टोंगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्याकडे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
वरोरा आणि भद्रावती तालुक्यात झालेल्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाहून गेली आहे. तरी सुद्धा ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, मंडळ अधिकारी याबाबत अजून गंभीरपणे घ्यायला तयार नाहीत व पंचनामे वेळेत पूर्ण करत नाहीत. त्यामुळे बळीराजाला आधार देण्याच्या दृष्टीने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आपल्या स्तरावरून देण्यात यावे अशी मागणी किशोर टोंगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
तसेच स्थानिक यंत्रांना अनेकदा प्रत्यक्ष पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे शेतकरी बांधव शासकीय मदतीपासून वंचित राहतो ते होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला आपल्या स्तरावरून देण्यात याव्या अशी विंनती देखील त्यांनी केली आहे.
याबरोबरच वरोरा भद्रावती परिसरात उद्योगवाढीसाठी असलेली पोषक परिस्थिती व त्यातून जिल्ह्यातील युवक युवतींना असलेली रोज्गाराची संधी याबाबत देखील उप मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याचे किशोर टोंगे म्हणाले. तसेच या सर्व प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे किशोर टोंगे यांनी सांगितले.