✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.13 सप्टेंबर) : – एकीकडे मराठा समाजाला कुणबी समाजाचे सरसकट प्रमाणपत्र देऊन ओबीसींमध्ये मराठा समाजाला समाविष्ठ करण्याकरिता जालन्यात जरांगे पाटलांनी अन्नत्याग आंदोलन केले असून त्याला जोरदार विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोज सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ठ करण्याच्याविरोधात विविध ओबीसींच्या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा विरोध नाही मात्र त्यांना वेगळे आरक्षण द्या असे ओबीसी संघटनांचे म्हणणे आहे.
किशोर टोंगे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र,म्हणाले की,कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला ओबीसिंमध्ये समाविष्ठ करू नये म्हणून चंद्रपूर मध्ये रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ओबीसींच्या सर्व जात समूहांचा महाविशाल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
ओबीसींची बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी,ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींकरिता स्वतंत्र वस्तीगृह आणि स्वाधार योजना तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा चंद्रपुरातून सुरू झालेल्या आंदोलनाचा भडका राज्यातच नव्हे तर देश्यात भडकेल याची तीव्रतेने नोंद महाराष्ट्र सरकारने तातडीने घ्यावी असे किशोर टोंगे म्हणाले.
पुढे किशोर टोंगे म्हणाले की,बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ५२% ओबीसी समाजाला ५२% आरक्षण देण्यात यावे.
सर्वोच्च न्यायालयाने लादलेली ५०% आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी आदी मागण्यांसह एकूण १२ मागण्यांसाठी महामोर्चा दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोज रविवारला राष्ट्रीय ओबीसी महासंघ,सर्व ओबीसी संघटना व सर्व जातीय संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किशोर टोंगे यांनी केले आहे.
याप्रसंगी उपोषणकर्ते रवींद्र टोंगे सह किशोर टोंगे,पांडुरंग टोंगे अध्यक्ष धनोजी कुणबी समाज भद्रावती,शुभम आमने ओबीसी कार्यकर्ते,सौ.संगीता धोटे ओबीसी महिला कार्यकर्त्यां,गौतम गेडाम अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय मंडळ,अंकुश वाघमारे विदर्भवादी नेते,संतोष डांगे सामाजिक कार्यकर्ते इत्यादीसह असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.