ऐतिहासिक विजासन टेकडीवर बुध्दमुर्तीची स्थापना

✒️ भद्रावती (Bhadrawati विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

भद्रावती(दि .3 जानेवारी) : – येथील ऐतिहासिक बुध्द लेणी टेकडीवरील बुद्ध मूर्तीची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी शहर बंद करत मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर मंगळवारी दुपारी ऐतिहासिक बुध्द लेणी टेकडीवर वंदनिय भिक्खू संघाद्वारे धम्म विधीनुसार नवीन ६ फुट उंच बुद्ध मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

भद्रावती शहरातील विजासन बुध्द लेणी ही बौध्द धर्मीयांचे श्रध्दास्थान आहे. या टेकडीवरील बुध्द मु्र्ती अज्ञात समाजकंटकांकडून तोडण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या समाज बांधवांनी टेकडीवर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाने नवीन बुद्धमूर्तीची स्थापना करून द्यावी अशी भुमिका घेतली होती.

मात्र बौध्द समाजबांधवांनी एकत्र येत व आर्थिक नियोजन करत तातडीने नागपूरवरून ६ फूट उंच बुध्दाची अष्टधातूची मुर्ती आणली. तसेच मंगळवारी वंदनीय भिक्खु संघाच्या हस्ते धम्मविधीनुसार ऐतिहासिक विजासन टेकडीवर बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.