एक विलक्षण योगायोग

✒️ नागपुर (Nagpur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

नागपुर (दि.1 फेब्रुवारी) :- 

मृत्यूनंतर काय होते? आत्मा अस्तित्वात आहे का? पुनर्जन्म खरोखरच होतो का? हे प्रश्न मानवाच्या मनात अनादी काळापासून रुंजी घालत आले आहेत. काही याला धार्मिक श्रद्धा मानतात, काही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतात, तर काही याला दैवी चमत्कार मानतात. अशाच एका अनोख्या घटनेने संपूर्ण गावात, सोशल मीडियावर आणि जनमानसात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुती येथे २९ जानेवारी रोजी विजय मारुती धवने यांच्या मातोश्री, अनुसया मारुती धवने यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मातृवियोगाच्या दु:खात संपूर्ण कुटुंब आणि गावकऱ्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. सारा परिसर अश्रूंनी ओथंबून गेला होता. परंतु याच वेळी, एका अद्भुत घटनेने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या.

अनुसया यांचे पार्थिव त्यांच्या घरातून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेण्यापूर्वी, अचानक एक वानर घराच्या अंगणात आला. त्याने शांतपणे पार्थिवाजवळ जाऊन त्याच्याकडे एकटक पाहिले. काही क्षण तो स्थिर उभा राहिला आणि अचानक, त्याने मृतदेहासमोर नतमस्तक होत नमस्कार केला!

कौतुक, आश्चर्य आणि श्रद्धेच्या भावनेने भरलेलं हे दृश्य बघताच गावकरी स्तब्ध झाले. हे वानर नेहमी गावात वावरणारे नव्हते, तरीही ते तिथे आले कसे? केवळ नमस्कार करूनच थांबले नाही, तर तिरडीकडे स्वतःहून ते पुढे सरकत मृतदेहाच्या चेहऱ्यावरील पदर हलक्याच हाताने बाजूला केला. जणू काही तो तिला शेवटचा निरोप देत होता! एवढ्यावरच थांबला नाही, तर वानराने अनुसया यांच्या डोळ्यावरील चष्माही अलगद बाजूला केला.

गावकऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी ही घटना पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. अंत्यसंस्काराची विधी सुरू असताना, वानर तिथेच बसून होते. कुणी त्याला हाकलले नाही, ना त्याने कुणाला त्रास दिला. अगदी अंतिमसंस्कार आटोपल्यानंतरही तो गावकऱ्यांसोबत स्मशानभूमीतून परतला! इतकेच नाही, तर नंतर जेव्हा अनुसया यांच्या अस्थी आणण्यासाठी कुटुंबीय गेले, तेव्हाही तो वानर उपस्थित होता.

या घटनेनंतर गावात चर्चा सुरू झाली. काहींनी याला केवळ एक योगायोग मानले, तर काहींनी दैवी चमत्कार म्हणून पाहिले. विशेष म्हणजे, अनुसया यांचे पती ‘मारुती’ यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते! आणि आता, त्यांच्या अंत्यसंस्काराला ‘वानर’ स्वरूपात कोणीतरी उपस्थित होते.

गावकरी हळहळले, नातेवाईक भारावले, आणि या घटनेने श्रद्धा आणि विज्ञान यामध्ये एक वेगळीच भावना निर्माण केली.

सोशल मीडियाच्या युगात हा क्षण कोणाच्याही नजरेतून सुटला नाही. उपस्थितांनी कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केले, आणि पाहता पाहता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कोणी याला हनुमानजींची कृपा मानली, कोणी पुनर्जन्माचा पुरावा समजले, तर काहींनी केवळ एक अजब योगायोग म्हणून स्वीकारले.

मृत्यू एक सत्य आहे, पण त्यानंतर काय होते, हे अजूनही एक गूढच आहे. पुनर्जन्माच्या कथा, चमत्काराच्या गोष्टी किंवा अदृश्य शक्तींची अनुभूती या सर्व गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत. परंतु, पिंपळगावातील या घटनेने नक्कीच अनेकांना अंतर्मुख केले.

कदाचित ही केवळ एक विलक्षण योगायोगाची गोष्ट असेल, पण कधीकधी अशा प्रसंगांमधूनच श्रद्धा अधिक दृढ होते. आणि माणसाला वाटते जिव्हाळ्याच्या नात्यांचे बंध हे शरीरापुरते मर्यादित नसतात, ते आत्म्याच्या अदृश्य बंधनांनी जोडलेले असतात.