🔹प्रकरणाची सखोल चौकशी करा आप पक्षाची मागणी
✒️सुनील चटकी चंद्रपूर(Chandrapur प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.29 ऑगस्ट) :- आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेने वडगाव प्रभागातील एक कोटी रुपयांच्या निविदा घोटाळ्याप्रकरणी चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात पक्षाने तीन ओपन स्पेसमधील अपूर्ण कामांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी एक वर्षापूर्वी हा घोटाळा उघडकीस आणला होता. या निविदेमध्ये झालेल्या कामाचे नाव बदलून टेंडर काढण्यात आले होते.
पक्षाने केलेल्या चौकशीनंतर पालिकेला सदर निविदा रद्द करावी लागली होती. मात्र एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.
हवेली गार्डन मधील अष्टविनायक ओपन स्पेस, काकडे लेआउट मधील ओपन स्पेस आणि लक्ष्मी नगर मधील राऊत यांच्या घरासमोरील ओपन स्पेस या तीन ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. या जागा आता खंडरात रूपांतरित झाल्या असून नागरिकांना, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलांसाठी खेळण्याच्या जागेचा अभाव निर्माण झाला असून ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नाही.
श्री राईकवार यांनी महानगरपालिकेकडे अपूर्ण कामे तात्काळ सुरू करणे, आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देणे, कामांच्या पूर्ततेसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करणे, एक कोटी निविदा घोटाळ्याची सखोल चौकशी करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे यासह अनेक मागण्या केल्या आहेत.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, ज्येष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हा सचिव राजकुमार नगराळे, प्रशांत सिदुरकर,शंकर सरदार अरोरा,कुणाल शेटे,योगेश गोखरे,राजू कूडे,संतोष बोपचे, अँड तबसुम शेख,जावेद सय्यद,संगम सागोरे,सतीश चोधरी,बॉबी सहानी,इंद्रपल यादव , विजेंदर सिंग गिल, मनोहर गाठे,श्रीनिवास मिसाला,हर्षल झोडे,संजय करलुके,संतोष कोल्हे,स्वप्नील साळवे सह प्रभागातील नागरिक उपस्थित होते .
आम आदमी पक्ष या मागणीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून योग्य ती कार्यवाही होई पर्यंत पक्ष या विषयावर सातत्याने लक्ष ठेवून राहील व आवश्यकतेनुसार पुढील पाठपुरावा करेल.