एकही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही…ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही

🔹उथळपेठ येथे वाचनालयाच्या इमारतीचे लोकार्पण

✒️ संजय तिवारी चंद्रपूर (Chandrapur जिल्हा प्रतिनिधी) 

चंद्रपूर(दि.8 जुलै) :- नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतीची असते. मात्र या सुविधा अधिक दर्जेदार करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी सरकारचे सहकार्य सर्वतोपरी असते. त्यातूनच पुढे अनेक कल्याणकारी योजना पुढे येतात. विद्यार्थी, नागरिकांच्या बौद्धिक विकासासाठी वाचनालयाची निर्मिती हा महत्वपूर्ण पुढाकार आहे. उथळपेठ गावात अशा अनेक दर्जेदार सुविधा प्रदान करताना कुणीही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत मुल तालुक्यातील उथळपेठ येथे वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उथळपेठचे सरपंच पलिंन्द्र सातपुते, उपसरपंच भारतीताई पिंपळे,नंदकिशोर रणदिवे, वर्षाताई लोनबाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपकार्यकारी अभियंता प्रशांत वसुले, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार श्रीमती मृदुलाताई मोरे, सहायक अभियंता राठोड, पोलीस पाटील भाग्यश्री चिचघरे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उथळपेठमध्ये वाचनालयाच्या इमारतीसाठी २ कोटी ५० लक्ष रुपये निधी खर्चून वाचनालयाची इमारत बांधण्यात आली . गावातील वाचनालयाची इमारत भव्य आणि अत्याधुनिक सुसज्ज असल्याचे सांगत त्यांनी इमारतीच्या बांधकामावर समाधान व्यक्त केले. नागरिकांना महत्वाच्या सेवा देण्यासोबतच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून बौद्धिक विकास साधण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. वाचनालयाची इमारत नागरिकांसाठी सेवाकेंद्र ठरावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

उथळपेठ गावात प्राधान्याने पांदण रस्ते बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देखील यावेळी दिले. जात, पात, धर्म महत्वाचे नाही विकासासाठी आम्ही तत्पर आहोत, असे सांगताना त्यांनी जास्तीत जास्त घरकुल उथळपेठमध्ये व्हावेत, यासाठी प्रयत्न करू, असे आश्वस्त केले.

उथळपेठ गावात ब्रिज कम बंधाराची मागणी अनेक दिवसांपासून आहे. ते लवकरच बांधून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ उथळपेठच्या प्रत्येक बहिणीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कमेटीचा अध्यक्ष स्वतः असल्यामुळे योजनेच्या लाभापासून कुणीही वंचीत राहणार नाही, अशी ग्वाही देखील ना. मुनगंटीवार यांनी दिली.

शेतकरी बांधवांना केंद्र सरकार कडून ६ हजार आणि राज्य सरकारचे ६ हजार रुपये मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आता सरकार उचलणार आहे. उद्या उथळपेठ गावातील मुलींना शिक्षणातील ध्येय या योजनेमुळे गाठता येईल, असेही ते म्हणाले. आता साडेसात हॉर्सपॉवरच्या पम्पांना शंभर टक्के वीज माफी दिली जाईल, अशी घोषणा देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दिलेला शब्द पूर्ण केला

नागरिकांनी विकासासंदर्भात मागणी केली तेव्हा तेव्हा ती पुर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा केली. चिचाळा व लगतच्‍या सहा गावांमध्‍ये बंद नलिका वितरण प्रणाली द्वार सिंचनाची सुविधा उपलब्‍ध केली, टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने ९० गावांमध्‍ये शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढविले, जे.के. ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन दुग्‍ध प्रकल्‍प राबविला.रस्ते,आरो मशिन, बंदिस्‍त नाल्‍या, कृषी वाचनालय आदी विकासकामे या गावात यापूर्वी पुर्णत्‍वास आणली.

आज वाचनालय इमारतीच्‍या बांधकामाबाबत दिलेला शब्‍द पुर्ण होत आहे. याचा मनापासून आनंद होत आहे असेही ते म्‍हणाले.