आपलं पाप लपवण्यासाठी काँग्रेसचा खोटा डाव

🔹ना.सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात; काँग्रेसकडूनच संविधानाची पायमल्ली

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.8 नोव्हेंबर) :- काँग्रेस राजवटीत गरीब आणखी गरीब होत गेला आणि नेते धनवान होत गेले. डीबीटीसारख्या योजना आणल्या असत्या तर ही वरकमाई बंद झाली असती. पण आपलं पाप लपविण्यासाठी काँग्रेस खोटा डाव खेळत आहे, अशी टीका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संविधान बदलेल अशी भीती काँग्रेस दाखवत आहे. पण संविधानाची पायमल्ली करीत काँग्रेसनेच आणीबाणी लागू केली होती, याचाही मुनगंटीवारांनी आवर्जून उल्लेख केला.

एका मुलाखतीत ते बोलत होते. इंदिरा गांधी यांच्या काळापासून बेरोजगारीचा प्रश्न आहे. तेव्हापासून हा प्रश्न काँग्रेसने चिघळत ठेवला. मात्र महाराष्ट्रात बेरोजगारीच्या मुद्द्यावर महायुतीचं सरकार व्यापकपणे काम करीत आहे. मोठे उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. काँग्रेसच्या राजवटीत विदर्भाचा विकास झाला नाही. पण आता चंद्रपूरसह विदर्भातील खेड्यापाड्यांपर्यंत विकास पोहोचला आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

*काँग्रेसकडून भ्रष्टाचाराला खतपाणी*

काँग्रेसने भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले. मात्र नरेंद्र मोदी यांचे सरकार येताच डीबीटी योजना सुरू झाली. आता कोणत्याही अधिकाऱ्याच्या हातात रोख रक्कम येत नाही. प्रत्येक योजनेचे पैसे थेट लाभार्थी व्यक्तीच्या खात्यात जातात, याचाही त्यांनी उल्लेख केला. 

*गरिबी नव्हे गरीब हटले*

काँग्रेसने सामान्यांचा पैसा लुटला. एवढा की कुबेराचा खजिनाही त्याच्यापुढे छोटा दिसेल. काँग्रेसने फक्त गरीबी हटाओचा नारा दिला. गरिबी तर हटली नाही, मात्र गरीब हटले. अगदी नेहरूपासून तर आता राहुल गांधी यांच्यापर्यंत हाच नारा सुरू आहे. खरंच गरीबांचे दु:ख दूर करण्यासाठी इतके वर्ष लागतात का, असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.