✒️सारंग महाजन बुलढाणा (Buldhana प्रतिनिधी)
बुलढाणा(दि.3 ऑक्टोबर) :- महाराष्ट्र सह विदर्भातील विशेषतः ग्रामीण परिसरातील भाविक भक्तांचे शक्तीपीठ म्हणून आदिशक्ती रेणुका मातेची ओळख आहे. चिखली शहराच्या मध्यभागी रेणुका मातेच्या मंदिराचा उंच कळस आठ ते दहा मैलावरून डौलाने ताठ दिमागत उभा असलेला दिसतो. रेणुका मातेचे मंदिर म्हणजे कुलदेवता प्रसन्न करणाऱ्या तपस्वींची तपोभूमी, ऋषीमुनिची यज्ञभूमी, देवतांच्या उपासनेची शक्ती भूमी होय.
निजामशाहीच्या कालखंडात पर धर्मीय सतत हल्ले करून हिंदूंचे मंदिर उद्ध्वस्त करत असत .अशा कठीण काळात मंदिरातील मूर्तीचे गावातील मंडळी हातात शस्त्र घेऊन संरक्षण करत असत .दरम्यान देवीची पूजाअर्चा करण्यासाठी तपस्वी बचानंद महाराज यांची नेमणूक झाली. कालांतराने मंदिरांच्या विश्वस्त मंडळाचे नेमणूक करण्यात आली .या संस्थांमध्ये दरवर्षी तीन उत्सव साजरे करण्यात येतात.
येथील अति प्राचीन असलेले रेणुका मातेचे मंदिर भक्ताच्या नवसाला पावणारे भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारे ग्रामदेवता आणि जागृत देवस्थान म्हणून या देवीची ओळख आहे नवरात्रउत्सवात परिसरातील असंख्य भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात रेणुका देवी वासंतिक नवरात्र उत्सव व भव्य यात्रा महोत्सवाची सांगता चैत्र पौर्णिमेला होते.
श्री शारदीय नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत उत्सवाचे स्वरूप असते घटस्थापने पासून दररोज श्री रेणुका माता आरती मंडळातर्फे सामूहिक आरती व इतर कार्यक्रम शासनाच्या सूचनाचे पालन करून करण्यात येतात. नवरात्र उत्सवात जिल्ह्यातील पर जिल्ह्यातील असंख्य भाविक देवीच्या दर्शन घेण्यासाठी मंदिरात येतात. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत मंदिरात भाविकांचे एकच गर्दी असते नवसाला पावणारी देवी अशी या तिची ख्याती आहे .संस्थानचा चोख व्यवस्थापनासह प्रगतीसाठी सर्व विश्वस्त सर्व वतनदार सेवेकरी आणि भक्तजन सदैव अग्रेसर राहतात.