आदिवासी पारधी विकास योजना आराखड्याबाबत आढावा सभा संपन्न  

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.15 जुलै) :- आदिवासी पारधी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी आदिवासी विकास विभाग व प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व चिमुर प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी आयोजित पारधी विकासाबाबत चंद्रपूर येथील प्रकल्प कार्यालयात संयुक्त आढावा बैठकीत सांगितले. आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांच्या मुख्य उपस्थितीत ही सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

धर्मेंद्र शेरकुरे यांनी राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला यामुळे आदिवासी विकास विभागाने दाखल घेत पारधी विकास नियोजन पुढील चालू वर्षाकरिता आराखडा तयार करण्यासाठी धर्मेंद्र शेरकुरे व त्यांच्या शिष्टमंडळात समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यापूर्वीही एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व चिमूर कडून वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना राबविण्यात येत होत्या परंतु या योजना पारधी पाड्यापर्यंत पोहोचत नव्हत्या आता थेट आदिवासी विकास निरीक्षक मार्फत कुटुंबाचे आर्थिक सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे प्रकल्प अधिकारी राचेलवार यांनी सांगितले.

येणाऱ्या वार्षिक वर्षात पारधी समाजाकरिता न्यूक्लिएटस बजेट मधून बटेर पालन ,तितर पालन ,शेळीपालन कोंबडी पालन ,मशरूम लागवड ,स्वाभिमान सबळीकरण योजना अंतर्गत कोरडवाहू जमीन चार एकर तर बागायती दोन एकर बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य नोंदणीकृत महिला व पुरुष बचत गटासाठी विटाभट्टी ,दाल मिल व मोठे गृह उद्योगासाठी योजना तसेच ठक्करबाप्पा योजनेतून वाड्यावर त्यांचा विकास कसा करता येईल यावरही चर्चा करण्यात आली.

यामध्ये सिमेंट रोड नाली बांधकाम पाणी शुद्धीकरण सयंत्र समाज भवन ,व्यायामशाळा ,पाणीपुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी राचेलवार म्हणाले तसेच वन हक्क पट्ट्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले येणाऱ्या पुढील काळात जी कामे अगोदर घ्यायची आहे त्यांना प्राधान्य क्रमाने तालुका निहाय कामे करू असे सांगितले पारधी समाजाला सर्व योजना देण्यात येतील व वाडी वस्त्या तांडे यांच्या विकासासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भरीव नीधीची तरतूद करणार असून यासाठीच आराखडा तयार केल्याचे चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व चिमूर प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रवीण लाटकर यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी बैठकीला आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र अंकुश शेरकुरे, सचिव गिरिधर नंनावरे, जगदीश पेंदाम ,पत्रकार तथा समाजसेवक, शालीक घोसरे, गजानन पवार, पोलीस पाटील प्रदीप धारणे प्रकल्प कार्यालयाचे स्वीय सहाय्यक सचिन आष्टणकर हे उपस्थित होते.