✒️वरोरा( विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.14 जानेवारी) :- आधुनिक युगात मानवी शरीरावर सकस आहारा अभावी विविध आजाराचे परिणाम दिसत आहे. त्यामुळे दररोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य चा वापर वाढविणे अतिशय गरजेचे असल्यामूळे मकरसंक्रांती चा दिवस आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री गजानन भोयर यांनी खेमजई येथील कृषी प्रदर्शन च्या उदघाटन प्रसंगी केले.
आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा यांच्या वतीने शेगाव मंडळामध्ये खेमजई या गावात राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये कृषी प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते . या कृषी प्रदर्शनीमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विविध तृणधान्याची माहिती देण्याकरता विविध स्टॉल लावण्यात आले होते.
मनुष्याने दररोजच्या आहारात ज्वारी,बाजरी,नाचणी, राजगिरा,कुटकी इ.पौष्टीक तृणधान्य चे सेवन केल्यास मधुमेह ,हृदयरोग ,कॅल्शियमची कमतरता ,रक्तशय, ऍसिडिटी बद्धकोष्ठता ,वजन वाढणे इत्यादी आजारापासून मुक्तता होऊ शकते. मानवी आहारातील महत्त्व विषद करून या पीकाच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले.
मंडळ कृषी अधिकारी शेगाव बु. श्री विजय काळे यांच्या मार्गदर्शनात कृषी सहाय्यक माधुरी राजूरकर व लता दुर्गे यांनी विशेष परिश्रम घेऊन कृषी प्रदर्शनी यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले. कृषी अधिकारी श्री मारुती वरभे व कृषी पर्यवेक्षक श्री गजेंद्र पुजदेकर यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.