अल्याड पल्याड चित्रपटाला प्रेक्षकांची दाद

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.16 जून) :- 

अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटालाही मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतून चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

२०० हून अधिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत सगळ्या वर्गामध्ये उत्सुकता पहायला मिळतेय.प्रसार माध्यमांतूनही चित्रपटाविषयी उत्सुकता होती आणि प्रदर्शनानंतरही बातम्या, समीक्षणांतून कौतुकाचा वर्षाव होतोय. रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज मराठीत अभावानेच पाहायला मिळतं. ‘अल्याड पल्याड’ च्या निमित्ताने एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षक व्यक्त करताहेत.  

आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे रहस्य याचा थरारक अनुभव देणारा एस. एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट ‘फुलटू एंटरटेनर’ असून मराठीत काहीतरी वेगळं बघायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे. आजवर मराठीत आलेला ‘उत्तम भयपट’ अशा शब्दांत चित्रपटाचे कौतुक प्रेक्षक करतायेत.

या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत.